ठाणे : ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यातील ६४३ शाळांमधील उपलब्ध ११ हजार ३३९ जागांसाठी तब्बल १९ हजार ५६८ अर्ज आले असुन यापैकी ९ हजार ५९७ विद्यार्थ्याची निवड आरटीई प्रवेशासाठी झाली आहे. तरी पालकांनी केवळ एसएमएसवर विसंबून न राहता संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित झाला की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ६४३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्हयात ११ हजार ३३९ जागा उपलब्ध केल्या आहेत.
या प्रवेशासाठी पालकांकडून महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.ठाणे जिल्ह्यातील एकूण ६४३ पात्र शाळांमध्ये एकूण १९५६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९ हजार ५९७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
पालकांना संदेश येणार
आरटीई अंतर्गत सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार (दि. २२ जुलै पासून संदेश (एसएमएस) येण्यास सुरुवात झाली आहे.