मुंबई : दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असून आता एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील रुबूनिसा मंजिल या इमारतीच्या बालकनीचा काही भाग कोसळ्याने एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रँट रोडच्या नाना चौक परिसरातील रुबूनिसा मंजिल या चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. तसेच इतर नागरिकांना इमारतीतून दुसरीकडे हलवण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - अजितदादांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला!
रुबूनिसा मंजिल इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग आणि स्लॅबचा भाग कोसळला आहे. तर वरच्या चार मजल्यांच्या संरचनेचा भाग अर्धवट कोसळला आहे. तसेच काही भाग लटकलेल्या अवस्थेत आहे. दरम्यान, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ७ ते ८ रहिवासी अडकून पडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. विविध बचाव साधनांचा वापर करून बचाव कार्य सुरू आहे. याशिवाय स्टेशन रोड परिसर वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
शुक्रवारपासूनच राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. यासोबतच मुंबईतही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.