अजितदादांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला!

    20-Jul-2024
Total Views |
 
NCP
 
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जुन्नर येथील आमदार अतुल बेनके यांनी शनिवारी शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनके हे खासदार अमोल कोल्हेंचे मित्र असल्याचेही सांगण्यात येते. त्यात त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
अतुल बेनके यांनी अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. भेटीनंतर अतुल बेनकेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई, दिलीप वळसे पाटील या सर्वांचा कायम माझ्यावर आशीर्वाद राहिला आहे. त्यांना बघतच मी मोठा झालो. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी जुन्नर तालुक्यातून निवडून आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही स्थित्यंतरे झाली, तेव्हा मी तब्बल सहा महिने तटस्थ भूमिकेत होतो. पण जुन्नर तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी असल्याने अने लोक विकास कामांच्या दृष्टीकोनातून अपेक्षेने पाहत असतात. त्यामुळे मी अजितदादांसोबत राहण्याचं ठरवलं," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "विधानसभा निवडणूकीला अजून दीड दोन महिने आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकतं. त्यावर आताच भाष्य करण्यात अर्थ नाही. तोपर्यंत महायूतीच्या जागावाटपावरून काहीही होऊ शकतं किंवा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात. पुढे काय होईल याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही," असेही ते म्हणाले.