अजय बारस्करांना धमकीचे फोन! थेट धमकी देणाऱ्यांची नावच केली जाहीर

    20-Jul-2024
Total Views |
 
Ajay Baraskar
 
मुंबई : अजय बारस्कर यांची पंढरपूरमध्ये गाडी जाळल्याने ते आक्रमक झाले आहेत. त्यांना धमकीचे फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट धमकी देणाऱ्यांची नावच जाहीर करुन टाकली. काही महिन्यांपूर्वी अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते.
 
अजय बारस्कर म्हणाले की, "मी ही गाडी जपानहून आयात केलेली होती. या गाडीने आजारी लोकांची, वारकरी लोकांची सेवा केलेली आहे. ही गाडी मी कशाला जाळणार? ती आपोआप जळली असा आरोप केला गेला. पण ती गाडी आपोआप जळूच शकत नाही. एक नलावडे नावाचा व्यक्ती, हिंगोलीचे विष्णू जाधव, छत्रपती संभाजीनगरचा रमेश पाटील, नांदगाव नाशिक सुधीर काजळे अशा अनेक जणांचे मला फोन आले. आम्हीच तुमची गाडी जाळली असं त्यांनी सांगितलं. आमचं सरकार आल्यावर तुझं कुटुंब उध्वस्त करु, अशा धमक्या मला त्यांनी दिल्या."
 
हे वाचलंत का? -  नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका! उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
 
याशिवाय मराठ्यांच्या प्रश्नांसाठी अजय बारस्कर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर बसले आहेत. "मराठवाड्यातील मराठ्यांचे प्रश्न सोडवा, या मागणीसाठी मी इथे बसलो आहे. मी फडणवीसांचा माणूस आहे, असा शिक्का माझ्यावर ठेवण्यात आला. पण आता सागर बंगल्यासमोर बसलो आहे. त्यांच्यात हिंमत नसेल पण माझ्यात आहे. आरक्षण हे मारूतीच्या मंदिरात मिळत नाही ते सरकारच देऊ शकतं," असे ते म्हणाले आहेत.