धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; १००हून अधिक कट्टरपंथीयांनी केला तरुणाच्या घरावर हल्ला
03-Jun-2024
Total Views |
भोपाळ : मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात कट्टरपंथी जमावाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टला इस्लामविरोधी म्हणत गोंधळ घातला. पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घरावर हिंसक जमावाने हल्ला केला, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. या काळात दगडफेकीच्याही घटना घडल्या. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण आठ जणांना अटक केली आहे. दंगल करणाऱ्या जमावामध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ही घटना शनिवार, दि. १ जून २०२४ घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बुरहानपूर जिल्ह्यातील गणपती नाका भागात घडली. शनिवारी रात्री येथील रहिवासी शोहराबुद्दीन कुरेशी यांनी जतन नावाच्या तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत, सोहराबुद्दीनने इंस्टाग्रामवर जतनने शेअर केलेल्या पोस्टचा संदर्भ दिला आणि ते इस्लामविरोधी असल्याचे वर्णन केले. तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र पोलीस तपास पूर्ण होण्याच्या आधीच १०० हून अधिक कट्टरपंथींनी राडा केला. या गोंधळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कट्टरपंथी जमावाने बुरहानपूरच्या इतवारा गेट परिसरात राहणाऱ्या जतनच्या घरावर हल्ला केला. कट्टरपंथी जमावाचा हल्ला पाहून जतनच्या समर्थनार्थही लोक जमा झाले. दोन्ही बाजूंनी जमाव जमल्याने तणावपूर्ण स्थितीत दगडफेक सुरू झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये जमाव 'अल्लाहू अकबर'चा नारा देताना ऐकू येत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. इंस्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या जतन या तरुणाला अटक करण्यात आली आहे. जतनवर भादंवि कलम २९५-अ आणि १८८ अन्वये कारवाई करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. जतनच्या घरी गोंधळ घालण्यासाठी आलेल्या जमावावरही पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. आयपीसीच्या कलम १४७, ३३६, ३५३ अन्वये एकूण १०६ हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.