१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद खानची तुरुंगात हत्या; नाल्याच्या झाकणाने केला हल्ला
03-Jun-2024
Total Views |
मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी मोहम्मद अली खान उर्फ मुन्ना याची त्याच्या सहकारी कैद्यांनी हत्या केली. त्याला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याला त्याच्या सहकारी कैद्यांनी बेदम मारहाण केली. याचं मारहाणीत मोहम्मद अली खानचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबा कारागृहात सकाळी कैद्यांची मोजणी केल्यानंतर आंघोळ करत असताना ही घटना घडली. मोहम्मद अली खान सकाळी आंघोळीसाठी गेले असता त्यांचा सहकारी कैद्यांशी वाद झाला, त्यानंतर सहकारी कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याला मारहाण केल्यानंतर एका कैद्याने जवळच असलेल्या नाल्याच्या झाकणाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे झाकण त्याच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
मोहम्मद अली खान तुरुंगातील परिमंडळ २ मधील बॅरेक ३ मध्ये होता. आंघोळीवरून भांडण होण्यापूर्वी त्याची बॅरेकमध्ये त्याच हल्लेखोरांशी बाचाबाची झाली होती, असे सांगण्यात आले. यानंतर बाहेर पोहोचल्यावर पुन्हा त्यांच्यात बाचाबाची झाली आणि वाद झाला, त्यानंतर हा खून झाला. प्रतिक उर्फ सुरेश पाटील, दीपक नेताजी, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास अशी मोहम्मद अली खानची हत्या करणाऱ्यांची नावे आहेत.
मोहम्मद अली खान उर्फ मुन्ना मर्फ भंवर लाल गुप्ता हा १९९३ च्या बॉम्बस्फोटात शस्त्रे आणि आरडीएक्स पुरवल्याप्रकरणी दोषी आढळला होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला २०१३ मध्ये कळंबा कारागृहात आणण्यात आले होते. यापूर्वी तो मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात होता.