"लोकसभा निवडणूकीत मतं दिली नाही म्हणून..."; आशिष शेलारांचा उबाठाला सवाल
25-Jun-2024
Total Views | 66
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत म्हणून आता तुम्हाला मराठी माणूस आठवला का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उबाठा गटाला केला आहे. मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के घरे आरक्षित ठेवा, अशी मागणी उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी केलं होतं. यावर आता शेलारांनी प्रत्युत्तर दिलं.
आशिष शेलार म्हणाले की, "आघाडीचे सरकार असताना तब्बल ५० टक्के प्रिमियम बिल्डरांना माफ केलंत, तेव्हा का नाही सांगितले की, मराठी माणसाला ५० टक्के घरे राखीव ठेवा? पत्राचाळीतील मराठी माणसाच्या घरांमध्ये कट कमिशन खाल्ले, तेव्हा मराठी माणसांची तुम्हाला आठवण झाली नाही का?" असा सवाल त्यांनी उबाठा गटाला आणि उद्धव ठाकरेंना केला आहे.
"२५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत होतात, तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं? लोकसभा निवडणुकीत मतं दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? मराठी माणसाला ५० टक्के आरक्षण मागायचे आणि उरलेल्यामध्ये 'हिरव्यांना' घुसूवायचे? असे तर नाही ना?" असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले की, भाजपाने गिरणी कामगारांना घरे दिली. बिडीडी चाळीतील मराठी माणसाची हक्काची घरे उभी राहिली. नुसते भावनेचे घोडे कागदावर नाचवायचे आणि मराठी माणसाला वर्षानुवर्षे फसवायचे," असा घणाघात आशिष शेलार यांनी उबाठा गटावर केला आहे.