मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. नाशिक शहरातील भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने किकवी पेयजल प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
छगन भुजबळ आपल्या पत्रात म्हणाले की, "आपल्या नाशिक शहरातील भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने किकवी पेयजल प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या पेयजल प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाचे काम तातडीने काम सुरू करावे."
"नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण पूर्ण होऊन ६५ वर्षे झाल्यामुळे त्यामध्ये गाळ साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. सन २००२ मधील 'मेरी'च्या अहवालानुसार गंगापूर धरणाच्या जिवंत साठ्यामधून ४३.७४९ दलघमी इतका साठा कमी झाला आहे. गंगापूर धरणाचा साठा पुनर्स्थापित करण्यासाठी या धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर ७०.३६ दलघमी क्षमतेचे (६०.०२ दलघमी उपयुक्तसाठा) नवीन धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे नाशिक शहराच्या मधून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूरनियंत्रण, ०.५० मेगावॅट वीजनिर्मिती, आदिवासी क्षेत्रात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे," असे ते म्हणाले.
सन २०१५-१६ च्या दरसूचीनुसार या प्रकल्पाची अद्ययावत किंमत ७८६.५० कोटी आहे. प्रकल्पाच्या बांधकामास निधी उपलब्ध झाल्यास लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे किकवी पेयजल प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या प्रकल्पाचे काम सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी, भुजबळांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. तसेच त्यांच्यासोबत याबाबत चर्चा सुद्धाकेली असून ते या प्रकल्पाचा विषय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत आणणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.