आणीबाणी म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग, पुन्हा कुणातही....!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी; अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनास प्रारंभ
24-Jun-2024
Total Views | 54
नवी दिल्ली : आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीवरील काळा डाग आहे. आणीबाणीच्या ५०व्या वर्षपूर्तीच्या एक दिवस अगोदर अठराव्या लोकसभेच्या पहिल्यया अधिवेशनास प्रारंभ होत असून संविधानात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, अठराव्या लोकसभेची स्थापना ही भारतातील सामान्य माणसाच्या संकल्पांची पूर्तता करण्याचे साधन आहे. देशाच्या विकासाला नवी गती देत आणि नवी उंची गाठण्यासाठी नव्या उत्साहाने सुरुवात करण्याची एक महत्त्वाची संधी आता प्राप्त झाली आहे. अठराव्या लोकसभेला आजपासून होत असलेली सुरुवात ही २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची संधी असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकांनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी सरकारची निवड केल्यामुळे सरकारची जबाबदारी तिप्पट वाढली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी सर्व खासदारांना लोककल्याण, लोकसेवा आणि जनहितासाठी शक्य तितक्या सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षाच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोक विरोधी पक्षाकडून त्यांनी पूर्णपणे त्यांची भूमिका बजावण्याची अपेक्षा करतात आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धरून ठेवण्याची अपेक्षा करतात. विरोधक त्या अपेक्षेला न्याय देतील, अशी आपल्याला अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा सर्व खासदार प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला.
आणीबाणी पुन्हा लावण्याची कुणातही हिंमत नाही
आणीबाणीस ५० वर्षे पूर्ण होत असून तो भारतीय लोकशाहीवरील काळा डाग आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय संविधान पूर्णपणे नाकारले गेले, लोकशाहीचे दमन केले गेले आणि देशाला कारागृहात रूपांतरित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना भारताच्या लोकशाही आणि लोकशाही परंपरांचे संरक्षण करण्याचा संकल्प घेण्याची गरज असून, जेणेकरून असे संकट पुन्हा कधीही येऊ नये; असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.