उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी!

    20-Jun-2024
Total Views |
 
Thackeray & Pawar
 
नागपूर : उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काहीही केलेलं नाही, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. त्यांनी गुरुवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आरक्षणाबाबत राज्याने निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार अनेक वर्षे सत्तेत होते. मुख्यमंत्री होते. मात्र त्यांची भूमिका मराठा आरक्षण विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सवलती दिल्या नाहीत. आता ते याविषयी बोलतात हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खटला योग्यरित्या कोर्टात लढला नाही. चांगले वकील लावले नाहीत. ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले. आता ते कोणत्या अधिकाराने बोंबा मारत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
हे वाचलंत का? -  मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत!
 
"उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी विचार सोडल्याने मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका सोडल्यामुळे मराठी माणूस, कोकणी माणूस आणि मुंबईतला माणूसही त्यांच्यासोबत नाही. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढवण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय कामे केली, हे जनतेला सांगावे. सकाळचा राजकीय भोंगा न वाजविता शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून द्यावा. विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवावी," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचे ५ दावेदार झाले आहेत. शरद पवार गटामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना, काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आणि उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं. पण त्यांनी खोटं आश्वासन देऊन मतं घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार, आदिवासी समाजाचे हक्क काढणार, असा अपप्रचार केला. पण मोदीजींनी संविधान हातात घेऊन तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. ज्याठिकाणी आमचे खासदार निवडून येतील तिथे आम्ही साडे आठ हजार रुपये देऊ, असे राहूल गांधी म्हणाले होते. त्यामुळे आता जिथे त्यांचे खासदार निवडून आले आहेत त्याठिकाणी मतदारांना साडेआठ हजार रुपये द्यावेत. अन्यथा लोक त्यांच्या घरासमोर रांगा लावतील," असा टोलाही बावनकुळेंनी लगावला.