मुंबई : मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "उबाठा अतिशय खोटारडा पक्ष आहे. सतत खोटं बोलायचं आणि रडत बसायचं. त्यांना रडे गट असं नाव दिलं पाहिजे. जिंकलो जिंकलो असा ढोल तुम्ही कुणाच्या जीवावर पिटत आहात हे आपल्या मनाला विचारा. प्रचारादरम्यान उबाठाच्या मिरवणूकांमध्ये पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगवे झेंडे हिरव्या झेंड्यावर वार करत होते. देशाचे बॉम्बस्फोटातील आरोपी त्यांच्या प्रचारात होते. याकूब मेमनचे कार्यकर्ते तुमच्या ऑफीसमध्ये फिरत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं. औरंगजेबाची वाहवाह करणाऱ्यांबरोबर तुम्ही बसलात. मतं मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे सर्वांनाच माहिती आहे. आता औवेसीपेक्षा उबाठाच आपला मसिहा त्यांना वाटू लागलाय," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "वरळीमध्ये उबाठा गटाने जेमतेम ६ हजार मतांचा लीड घेतला आहे. काहीजण म्हणत होते की, इथे आम्ही ५० हजारांचा लीड घेणार आहोत. मग आता राजीनामा देणारे कुठे गेलेत? तुम्हाला भेंडी बाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागेल. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत अशी यांची अवस्था झाली आहे," असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे.