"तात्पूरती आलेली सूज काही दिवसांनी...;" मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात
20-Jun-2024
Total Views | 66
मुंबई : उबाठा गटाची तात्पूरती आलेली सूज काही दिवसांनी उतरेल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. बुधवारी वरळीतील डोम येथे शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "या एकंदरीत राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ मतदार दुसरीकडे गेला नाही तर धनुष्यबाणाकडे वळला. शिवसेनेचे १९ टक्के मूळ मतदार आहेत. त्यापैकी साडे चौदा टक्के मतदार आपल्या शिवसेनेकडे आलेत आणि साडे चार टक्के तिकडे राहिलेत. त्यांच्याकडे इतर मतं कशी आली आणि कुठून आलीत हे तमाम महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ही तात्पूरती आलेली सूज आहे. काही दिवसांनी ती उतरेल."
"उबाठाला आता उठा बसा संघटना असं नाव ठेवायला हवं. काँग्रेसने ३२८ जागा लढवून फक्त ९९ जागा जिंकल्या. ते काठावरही पास झाले नाहीत. पण एवढा उन्माद केला जसं काही देशात काँग्रेसचंच सरकार आलं. १२ जागांवर हरलेली उबाठा जीत का जश्न मना रही है. उबाठा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे हे लाचार आहेत," असा हल्लाबोल त्यांनी केला.
"तुम्ही मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले. आज आम्ही लोकसभेच्या ७ जागा जिंकलो. आम्ही आणखी ३ ते ४ जागा नक्की जिंकलो असतो. पण आपण का हरलो हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यात मी जात नाही. आता मागचं सगळं विसरून आपल्याला महायूती ताकदीने पुढे न्यायची आहे," असेही ते म्हणाले.