मुंबई : लोकसभेत घासून पुसून नाही तर आम्ही ठासून विजय मिळवला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. बुधवार, १९ जून रोजी वरळी डोम येथे शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत आपण शिवसेनेचे ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर हे बालेकिल्ले अबाधित राखले. कुणी म्हणालं ठाणे पडेल, कल्याण पडेल पण ठाणे आणि कल्याणमध्ये दोन लाखांपेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलो. कोकणात उबाठा गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून मिळवला आहे."
"शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत आहे. त्यामुळे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्यासमोर मतमस्तक होतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. तो उठाव योग्य होता यावर जनतेने निवडणूकीत शिक्कामोर्तब केलं आहे. मतदाराने दाखवलेल्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… पण आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदूत्वाची एलर्जी झालेली आहे. शिवतीर्थावर इंडी आघाडीच्या समोर ते तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाहीत. पण आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातदेखील त्यांनी हे बोलण्याचं धाडस केलं नाही. कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आणि त्यांचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही," अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.