मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ०४ जूनला जाहीर होणार असून तत्पूर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला देशात तिसऱ्यांदा बहुमत मिळणार आहे. याच एक्झिट पोल अंदाजावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, इंडिया आघाडीला २९५ ते ३१० जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, हा आमचा जनतेमधून घेतलेला कौल असून एक्झिट पोल नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच, एक्झिट पोलचा दावा फेटाळून लावतानाच देशात एनडीएचे नाही तर इंडिया आघाडीचे सरकार येईल, असे राऊत म्हणाले. राज्यात मविआला ३५ हून अधिक जागा मिळणार असून बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी विजयी होतील. उबाठा गटाचा १८चा आकडा कायम राहील तर काँग्रेसलाही चांगले यश मिळेल, असेही राऊत म्हणाले.
शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सायंकाळी ६:३० सुमारास एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशात तिसऱ्यांदा एनडीएला बहुमत मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एक्झिट पोलची खिल्ली उडवली असून भाजपला ८०० ते ९०० जागा देतील, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली आहे.