कोलकाता : हिजाबच्या मुद्द्यावरून एका मुस्लिम महिला शिक्षिकेने कॉलेज सोडण्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हे प्रकरण राजधानी कोलकाता येथील एका खाजगी विधी महाविद्यालयाशी संबंधित आहे, जिथे या शिक्षकाला हिजाब परिधान करून वर्गात शिकवण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, विरोध झाल्यानंतर तिला ओढणी डोक्यावर घेण्याची परवानगी देण्यात आली. आता तिने पुन्हा कॉलेजला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
कॉलेजनेही यावर प्रतिक्रिया दिली असून, मुस्लिम शिक्षिकेच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. शिक्षिका संजीदा कादर यांनी कॉलेज व्यवस्थापनाला ईमेल पाठवून कळवले की ती यापुढे येथे शिकवणार नाही. एलजेडी लॉ कॉलेज, टॉलीगंजच्या व्यवस्थापनाने सोमवार, दि. १७ जून २०२४ संजीदा कादर यांना एक ईमेल संदेश पाठवला होता की ती कॉलेजने शिक्षकांसाठी बनवलेल्या ड्रेस कोडचे पालन करून येथे परत येऊ शकतात.
याशिवाय तिला या काळात डोकं झाकण्यासाठी दुपट्टा वापरता येईल अशी सुविधाही देण्यात आली होती. यानंतर शिक्षकांनी उत्तर देण्यासाठी आठवडाभराचा अवधी मागितला. गुरुवारी कॉलेजला पाठवलेल्या ईमेलमध्ये, शिक्षिकेने सांगितले की, कॉलेजच्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर तिने निर्णय घेतला आहे की ती संस्थेत पुन्हा नोकरी करणार नाही आणि नवीन संधी शोधणार आहे. मुस्लिम शिक्षिकेने सांगितले की तिला असे वाटले की तिच्या करिअरच्या ध्येयांसाठी हा सर्वोत्तम पर्याय नाही.
त्यानंतर कॉलेजने तिच्या निर्णयाचा आदर केला आणि तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रमजानच्या महिन्यापासून संजीदा कादरने कॉलेजमध्ये वर्गात हिजाब घालायला सुरुवात केली. संजीदा कादर म्हणाल्या की, या महाविद्यालयात शिकवण्यासाठी परत जाणे त्यांना सोयीचे होणार नाही. हिजाब घालण्यापासून रोखणे हे तिच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे तिने म्हटले आहे. पश्चिम बंगाल अल्पसंख्याक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.