"रस्त्यावर नमाज पठण होणार नाही" - बकरीदच्या आधी योगी आदित्यनाथ यांचे स्पष्ट निर्देश
14-Jun-2024
Total Views | 48
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवार, दि. १३ जून २०२४ रोजी बकरीदच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांना बकरीदच्या दिवशी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू नये, बंदी असलेल्या प्राण्यांची कुर्बानी देऊ नये आणि कुर्बानी दिलेल्या जनावरांच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.
बकरीद सोमवार, दि. १७ जून २०२४ आहे. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, दि. १६ जून रोजी गंगा दसरा, दि. १७ जून रोजी बकरीद, दि. १८ जून रोजी ज्येष्ठ महिन्याचा मंगल उत्सव आणि दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोहरम आणि कावड यात्रा जुलैमध्ये होणार आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था राखावी लागणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, बकरीदला कुर्बानी करण्याची जागा आधीच ठरवली पाहिजे. ठरवून दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतरत्र कुर्बानी देऊ नये. वादग्रस्त आणि संवेदनशील ठिकाणी कुर्बानी देऊ नये. निषिद्ध प्राण्यांचा बळी कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. नमाज रस्त्यावर न करता परंपरेनुसार ठरलेल्या ठिकाणीच व्हावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, प्रत्येकाने श्रद्धेचा आदर केला पाहिजे, परंतु कोणत्याही नवीन परंपरेला प्रोत्साहन देऊ नये. प्रत्येक सण शांततेत आणि सौहार्दाने साजरा व्हावा यासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
ज्येष्ठ महिन्यात बडा मंगलावर भंडारा आयोजित करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री योगी यांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. प्रसाद खाल्ल्यानंतर रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये, असे आयोजकांना स्पष्टपणे सांगावे, असेही ते म्हणाले. प्रत्येक भंडारा येथे कचराकुंडी उपलब्ध असावेत. इतर धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतील अशी कोणतीही घटना घडू नये, असे ते म्हणाले.