मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला!
13-Jun-2024
Total Views |
जालना : मराठा आरक्षणाबाबत सगे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. दरम्यान, गुरुवारी राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं आहे. मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला गेले असून त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात येत आहे. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही करण्यात येत आहे.
यावेळी मंत्री शंभुराज देसाई जरांगेंना म्हणाले की, "मंत्री म्हणून नाही तर मित्र म्हणून माझं म्हणणं आहे की, तुम्ही उपचार घ्यायला हवे. तुम्ही तब्येतीने पुर्णपणे खंबीर असायला हवं. तुमच्या लढ्यामुळे १० टक्के आरक्षण मिळालं आहे. आता फक्त सगे सोयऱ्यांबाबतचा अध्याधेश पारित करणं राहिलं आहे. कुठलंही नवीन नोटिफिकेशन काढताना त्यावर हरकती घ्याव्या लागतात. तसं न करता घाईगडबडीत केलं तर ते कोर्टात रद्द होईल. त्यामुळे आपण हरकती मिळवण्याचंही काम सुरु केलं आहे." असे त्यांनी सांगितले.
"सगेसोयऱ्याचं काम करायचं नाही असं अजिबात नाही. सरकारची तशी मानसिकता नाही. त्यामुळे तुम्ही ते पुर्णपणे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे. त्यामुळे काहीही झालं तरी कायद्याच्या चौकटीत बसवून आपण हा प्रश्न सोडवू. मी स्वत: याबाबत बैठक घेतो. तुम्ही तुमचे प्रतिनिधी बोलवा. पण तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी," अशी विनंती शंभुराज देसाईंनी जरांगेंना केली आहे. तसेच त्यांनी जरांगेंना एक महिन्याचा वेळ मागितला आहे.