मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी दाखल! नेमकं कारण काय?
07-May-2024
Total Views | 180
पुणे : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. मतदान केल्यानंतर त्या अजितदादांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आज (मंगळवार) सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये बहुचर्चित बारामती मतदारसंघाचा समावेश आहे. याठिकाणी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. दरम्यान, मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटोवाडीतील घरी दाखल झाल्या आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
परंतू, आपण आशाकाकींना भेटायला आलो असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. अजितदादांच्या घरून परतताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "आशाकाकींना भेटण्यासाठी मी आले होते. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले होते. मी नेहमीच आमच्या घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेत असते. माझं सगळं लहानपण या घरात गेलं आहे. मी आशाकाकींकडे दोन महिने राहिलेली आहे. जेवढं माझ्या आईने माझं केलं नसेल तेवढं आशाकाकी, सुमतीकाकी आणि भारतीकाकींनी केलं आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले होते," असेही त्यांनी सांगितले.