राज्यात 'या' तीन मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
07-May-2024
Total Views |
मुंबई : महाराष्ट्रात आज (मंगळवार) लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्याकरिता ११ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. यापैकी बारामती, सांगली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर सर्वांच्या नजरा खिळून आहेत. या मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मंगळवारी रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. यातील बारामती, सांगली आणि कोल्हापूर हे तीन मतदारसंघ सध्या चर्चेत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभेत यंदा प्रथमच एकाच घरातील दोन उमेदवारांमध्ये लढत आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे मैदानात आहेत. त्यामुळे इथे सध्या पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पवारांच्या घराण्यातील खासदार असलेल्या या मतदारसंघात यावेळी अजित पवार आणि शरद पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहिलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या काँग्रेस नेत्याने थेट बंडखोरी केली आहे. याठिकाणी महायूतीचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील हे मैदानात असताना काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे इथे सध्या तिरंगी लढत सुरु आहे. याशिवाय विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मविआतील मतांमध्ये फूट पडल्याचेही सांगण्यात येत आहे.
तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्यासमोर महायूतीच्या संजय मंडलिक यांचं आव्हान आहे. त्यामुळे छत्रपतींचं घराणं असलेल्या कोल्हापूरात यंदा मविआ आणि महायूती या दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.