नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकी आता अखेरच्या टप्प्यात आली असून १ जून रोजी शेवटचे मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार असून एकूण ५७ जागांसाठी ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे.
यापूर्वी २०१९ साली या ५७ जागांपैकी भाजपला २५ जागांवर विजय मिळाला होता, तर काँग्रेसला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्याचप्रमाणे जदयुला ३ जागा, अपना दल २, शिरोमणी अकाली दल २, आम आदमी पक्षाला १, बिजदला २, झारखंड मुक्ती मोर्चास १ आणि तृणमूल काँग्रेसला ९ जागांवर विजय मिळाला होता.
पंजाबमध्ये २७ वर्षांपासून भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवत असलेला अकाली दल यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीही स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना यावेळी त्यांच्या जागा वाढण्याची आशा आहे.
तसेच यावेळी हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने भाजपला क्लीन स्वीप करण्यापासून अडविण्याचा काँग्रेसचा दावा आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये गतवेळी १३ पैकी ९ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा दावा केला आहे.