नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे देशातील आजपर्यंतच्या सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मुंगेशपूर येथील हवामान केंद्रात दुपारी 2.30 वाजता 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवार हा देशातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला.
यासोबतच दुपारी साडेचारच्या सुमारास दिल्लीत काही ठिकाण पावसाच्या सरीदेखील पडल्या. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून अगदी अल्प प्रमाणात दिलासा मिळाला. कडाक्याच्या उष्णतेच्या दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक 8,302 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, शहरातील बहुतांश रहिवासी वातानुकूलित यंत्राचा वापर करत असल्याने विजेची मागणी वाढली आहे.