मुंबई : उद्धवजी म्हणतात माझा पक्ष मुंबईकरांसाठी आहे. मग आता ते लंडनची नालेसफाई पाहायला गेले आहेत का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. त्यांनी शनिवारी दहिसर नदी, भाबली पाडा नाला, एन एल कॉम्प्लेक्स नाला इथे जाऊन नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीचं स्वागत केलं. ते म्हणाले की, "जबाबदार मुख्यमंत्री आणि बेजबाबदार मुख्यमंत्री यांच्यात हाच फरक आहे. उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपल्या वर्षा निवासस्थानी बसून नाल्यावर फिरत होते. घरात बसून ते नाल्यांची पाहणी करत होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महानगरपालिकेत स्वत: जाऊन जबाबदार मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत."
"मी आणि माझा पक्ष मर्द आहे, माझा पक्ष मुंबईरकरांसाठी आहे, असे ते म्हणतात. मग आता उद्धवजी लंडनचे नाले बघायला गेले आहेत का? ते लंडनची नालेसफाई का बघत आहेत. उद्धवजींच्या पक्षाचं मुंबईवर पुतणा मावशीचं प्रेम आहे. उद्धवजींनी लंडनच्या नालेसफाईचे आकडे तरी दाखवावेत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते. मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दुमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का?" असेही ते म्हणाले.