ठाणे : डोंबिवलीतील अंबर कंपनीत झालेल्या दुर्घटनेनंतर कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना अटक करण्यात आली होती. मात्र, आता मालती मेहतांची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा कंपनीशी संबंध नसल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
गुरुवार, २३ मे रोजी डोंबिवलीतील अंबर कंपनीत स्फोट झाल्याने अनेकजणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर कंपनीच्या मालक मालती मेहता फरार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना आणि त्यांचा मुलगा मलय मेहता यांना नाशिकमधून अटक करण्यात आली होती.
परंतू, चौकशीमध्ये त्यांचा कंपनीशी संपर्क नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी रात्री उशीरा त्यांची सुटका केली आहे. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीतील अंबर कंपनीत भीषण स्फोट प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने अंबर कंपनीला क्लोजर नोटिस बजावली आहे. कंपनीने उत्पादन प्रक्रिया बंद करावी असे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या शेजारील ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत. त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी अशी नोटिसदेखील बजावण्यात आली आहे.