नवी दिल्ली : 'आप'ने परदेशातून घेतलेल्या कोट्यावधीच्या निधीच्या स्त्रोताची ओळख लपवल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. ईडीने अहवालात म्हटले आहे की, 'आप'ला हा पैसा कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड आणि मध्य पूर्व देशांतून मिळाला आहे. परदेशी निधी आपकडे पोहचवण्यासाठी अनेक अनियमितता करण्यात आल्या.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाला २०१४ ते २०२२ दरम्यान ₹ ७.०८ कोटींचा विदेशी निधी मिळाला आहे. हा पैसा फॉरेन फंडिंग ॲक्ट (FCRA) च्या नियमांचे उल्लंघन करून घेण्यात आला आहे. या निधीबाबत ईडीने अहवाल तयार केला असून, तो गृह मंत्रालयाला पाठवला आहे. त्याचा काही भाग बाहेर आला आहे.'आप'ला हा निधी देणाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी एकच पासपोर्ट नंबर, एकच मोबाइल नंबर आणि क्रेडिट कार्ड तपशील देऊन ही रक्कम दिल्याचे अहवालात म्हटले आहे. हा सर्व निधी कॅनडा, न्यूझीलंड, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांकडून आला आहे.
या बेकायदेशीर निधीचे उदाहरणही अहवालात नमूद करण्यात आले आहे. परदेशात राहणाऱ्या १५५ लोकांनी ५५ पासपोर्ट वापरून AAP ला १.०४ कोटी रुपयाचा निधी दिला. आप'चे नेते दुर्गेश पाठक यांनी २०१६ मध्ये कॅनडामध्ये 'आप'साठी गोळा केलेल्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.या संपूर्ण गोंधळाचा पुरावा म्हणून ईडीने आप अधिकाऱ्यांमधील ईमेल संभाषणांचा तपशीलही दिला आहे. हा संवाद कुमार विश्वास, कपिल भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि अनिकेत सक्सेना यांच्यात झाला. हे सर्वजण तेव्हा 'आप'मध्ये महत्त्वाच्या पदांवर होते. याशिवाय ईडीच्या या अहवालात निधीबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत.
दहशतवादी पन्नूनेही 'आप'ला निधी दिल्याचा आरोप
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांनी मार्च २०२४ मध्ये भगवंत मान आणि केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीसाठी खलिस्तानवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप केला होता. पन्नू यांनी सांगितले होते, "२०१४-२०२२ दरम्यान, खलिस्तानींनी AAP सरकार स्थापन करण्यासाठी $१६ दशलक्ष (₹१३३ कोटी) दिले."