काँग्रेसची परिस्थिती केविलवाणी! राज्याचे नेतृत्व कमकुवत : अशोक चव्हाण

    09-Apr-2024
Total Views |
 
Ashok Chavan
 
मुंबई : राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत असल्याने पक्षाची केविलवाणी परिस्थिती झाली आहे, अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. ते मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत होते.
 
अशोक चव्हाण म्हणाले की, "निवडणूकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात. त्यामुळे दानवेंच्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. जनतेचा कौल हा महायूतीच्या बाजूने राहणार आहे हे आगामी काळातल्या निवडणूकीचे निकालच सांगणार आहे. राज ठाकरे मधल्या काळात अमित शाहांना भेटले होते. या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की, महायूतीला त्यांचं समर्थन असेल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "उद्धवजी, ४ जूननंतर तुम्हाला तुमचं आवडतं काम करावं लागेल!"
 
ते पुढे म्हणाले की, "देशात मोदींच्या विरोधात कुणीच नाही अशा प्रकारची निवडणूक आहे. विरोधी पक्ष हतबल असून त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे. महाराष्ट्रातील जागावाटपात काँग्रेस पक्षाला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची एवढी केविलवाणी परिस्थिती कधीही झालेली नव्हती. भिवंडी आणि सांगलीची पारंपारिक जागा सोडून देण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्राचं नेतृत्व किती कमकुवत आहे, हे स्पष्ट होत आहे," असेही ते म्हणाले.