"उद्धवजी, ४ जूननंतर तुम्हाला तुमचं आवडतं काम करावं लागेल!"
09-Apr-2024
Total Views |
मुंबई : उद्धव ठाकरे, ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "महाभ्रष्टाचारी आघाडीनं ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करीत आहेत. हा एक मोठा विनोद आहे. मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गॅंग कोण चालवत होतं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचं आधी उबाठा यांनी उत्तर द्यावं."
"खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गॅंगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामादेखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय," असे ते म्हणाले.
महाभ्रष्टाचारी आघाडीनं ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान आदरणीय @narendramodi जींवर टीका करीत आहेत. हा एक मोठा विनोद आहे.
मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गॅंग कोण चालवत होतं ? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 9, 2024
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं की, २०१४ आणि २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल," असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे.