बारामतीतील १०० टक्के कामं मी केलीत, परंतू...; अजितदादांचा सुप्रियाताईंना टोला

    09-Apr-2024
Total Views |
 
Ajit Pawar
 
पुणे : बारामतीतील १०० टक्के कामं मी केलेली आहेत. परंतू, काहींनी स्वत:च्या पुस्तकात हे आम्हीच केलं आहे, असं दिलं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते मंगळवारी बारामतीतील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "बारामतीतील १०० टक्के कामं मी केलेली आहेत. परंतू, काहींनी स्वत:च्या पुस्तकात हे आम्हीच केलं आहे, असं दिलंय. आताच्या विद्यमान खासदारांच्या पुस्तकात नगरपालिकेची इमारत दिसली. पण याला सगळा पैसा मी दिला. त्याचं डिझाईनही मी केलं. पंचायत समिती, बसस्थानक, पोलिसांचे ऑफिस ही कामं मी केली."
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसची परिस्थिती केविलवाणी! राज्याचे नेतृत्व कमकुवत : अशोक चव्हाण
 
"परवा मी नमो महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात १० हजार पेक्षा जास्त मुलामुलींना नोकऱ्या मिळाल्या. यावर काहींनी टीका केली की, एवढा मोठा कार्यक्रम केला आणि फक्त १० हजारच नोकऱ्या दिल्या. पण आपण कधी हजार नोकऱ्या तरी दिल्या का? खरंतर जे चांगलं झालं ते चांगलं केलं म्हणायला हवं," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "यावेळी भावनिक होऊ नका. काही काही गावांमध्ये जरा वेगळं सुरु आहे. या वयात कसं करायचं असं सुरु आहे. आता आपले कामाचे आणि विकासाचे दिवस आहेत. कुणी काहीही सांगितलं तरी केंद्र सरकार त्यांच्या हातात नसल्याने ते काहीच करु शकत नाही. पुढे मतदान करताना प्रत्येकाने पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद कुणामध्ये आहे हे डोळ्यासमोर आणलं पाहिजे. कमीत कमी पुढची १० वर्षे कोण काम करु शकतं? ही वस्तुस्थिती असून त्याला कुणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे बारामतीकरांनो बारामतीचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे," असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी विजय शिवतारेंना काही लोकांनी माघार घेऊ नका असे रात्री फोन करुन सांगितले असल्याचेही ते म्हणाले. "चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. त्यामुळे सासूने सासऱ्याने जरा घरी बसावं," असा टोलाही त्यांनी लगावला.