मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर, तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शिट्टी ही निषाणी देण्यात आली आहे. मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने यासंदर्भातील यादी जाहीर केली.
प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात भाजपकडून अनुप धोत्रे, तर काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यात यंदा तिरंगी सामना पहायला मिळणार आहे.
दुसरीकडे, परभणीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक न लढता, स्वतःच्या पक्षातर्फे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाने विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना पुन्हा मैदानात उतरवले असून, ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील.
कुठे किती उमेदवार?
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार रंगात येऊ लागला असताना, दुसऱ्या टप्प्यातील पाच मतदारसंघामधून २०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक ३७ उमेदवार अमरावतीत, तर सर्वात कमी १५ उमेदवारांनी अकोल्यातून अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये दि. १९ एप्रिल रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे . दुसऱ्या टप्प्यासाठी ३५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४८ जणांनी माघार घेतली.