माऊलींचे बुद्धिबळामृत घेत खेळत उमगूया मोक्षप्राप्तीचे गमक...
07-Apr-2024
Total Views |
कॅनडा इथे सुरू असलेल्या, ‘जागतिक बुद्धीबळ विजेतेपद’ स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. बुद्धीबळ जगात खेळला जात असला, तरी त्याचा समावेश ‘अॅालिम्पिक’मध्ये नाही. याच खेळाचा ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या अंगाने केलेला विचार या लेखात पाहू...
जागतिक बुद्धीबळ विजेतेपदासाठी असलेल्या, ’कॅण्डिडैट्स’ स्पर्धा टोराँटो कॅनडा येथे बुधवार, दि. ३ एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धीबळपटू आणि ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा’चा (फीडे) उपाध्यक्ष असलेल्या, विश्वनाथन आनंदने या स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रथमच खुल्या आणि महिला विभागातील ’कॅण्डिडैट्स’ स्पर्धा एकाच ठिकाणी होत आहेत. त्यात भारतीय बुद्धीबळपटूंचा सहभाग लक्षणीय आहे. आर. प्रज्ञानंद आणि त्याची बहीण वैशाली हे भाऊ-बहीण त्यात आहेतच, तर नाशिककर असलेला विदित गुजराथी यांच्यासमवेत डी. गुकेश देखील त्यात आपले कसब दाखवत आहे. काल वाचलेल्या पहिल्या वृत्ताने भारतीयांचा रविवार छान गेला असेलच. कारण, भारताच्या पाचही बुद्धीबळपटूंनी ‘कॅण्डिडैट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेतील आपल्या मोहिमेस समाधानकारक सुरुवात केली आहे. अशा बुद्धीबळाच्या बातम्या वाचल्यावर, भारतीयांचा उन्हाळ्यातला रविवार खचितच आल्हाददायक ठरला असेल.
भारतात सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या मोसमात बहीण-भाऊ तसेच मित्र-मैत्रिणी उन्हातान्हाचा त्रास टाळण्यासाठी, घरातल्या घरात खेळायचे क्रीडा प्रकार काढून त्याचा आनंद घेत आहेत. घरोघरी सध्या मुले व क्रीडा (क्रिकेट)प्रेमी दिवेलागणीला ’भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने (बीसीसीआय) प्रारंभ केलेली व जगप्रसिद्ध ठरलेली ’इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) ही भारतातील २० षटकांच्या (टी २०) क्रिकेट विजेतेपदासाठीच्या साखळी स्पर्धा बघत, दूरचित्रवाणींवर बसलेले आढळतील. आता तर काय पालकवर्गही पाल्यांना रोखू शकत नाही; कारण आता उन्हाळी सुट्ट्या लागत असल्याने, अभ्यासाचाही प्रश्नच नाही. ’आयपीएल’बरोबर अनेक पालक निवडणुकांच्या चर्चेत आडकलेले दिसत आहेत.
नेमेची येणारा, तर कधी अवकाळी येणारा असा पावसाळा वगळता क्रिकेटप्रेमींसाठी अन्य काळ हा मेजवानीचाच असतो. मुलांना क्रिकेट खेळायचा कधीच कंटाळा येत नसतो. रणरणत्या उन्हाचा मुलांना काही त्रास होत नसतो. बिचारे पालकच त्यांना दुपारच्या उन्हात खेळू नका रे म्हणून ओरडत असतात. शाळेत तर कशाच्या अन् कशाच्या तरी साहाय्याने क्रिकेट सदा खेळताना आपण बघतो. अगदी फूलस्केप वहीची बॅट करून, ते कशानेही खेळले जाते. असे हे क्रिकेट तर आता ’ऑलिम्पिक’ स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत आहे. आगामी २०२८च्या ‘लॉसएंजलिस ऑलिम्पिक’मध्ये क्रिकेटचाही सहभाग असेल, तर असा हा प्रसिद्ध मैदानी खेळ. पण, घरातल्या घरात देखील खेळला जाणारा बैठा खेळ असलेल्या बुद्धीबळाचा डाव मात्र अजूनही ’ऑलिम्पिक’ क्रीडा प्रकार म्हणून प्रवेश करण्यास अपयशी ठरत आहे.
एखाद्या क्रीडा प्रकाराला ’आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटने’कडून अधिकृतपणे मान्यता मिळू शकते; परंतु ’ऑलिम्पिक’ खेळांमध्ये तो स्पर्धात्मक कार्यक्रम बनू शकत नाही. अजूनही बुद्धीबळ हा मान्यताप्राप्त खेळ असला, तरी तो ’ऑलिम्पिक’मध्ये खेळवला जात नाही. याच बुद्धीबळाचा समावेश ’ऑलिम्पियाड’मध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून मात्र नावाजला जात असतो. १९२४च्या ’ऑलिम्पिक’च्या खेळांमध्ये बुद्धीबळाचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु हौशी आणि व्यावसायिक खेळाडूंमध्ये फरक करण्याच्या समस्यांमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
भारतात ऐतिहासिक, पौराणिक काळापासून प्रसिद्ध असलेला बुद्धीबळ हा खेळ भारतीय क्रीडा प्रकारासमवेतच ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि क्रीडा प्रकार अशा विविध ठिकाणी आपल्याला आढळेल. संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला सोप्या मराठी भाषेतून दाखवून दिलेला अमृतानुभव, हा ज्ञानोत्तर भक्तीच्या म्हणजेच भागवत धर्माच्या पायाभूत सिद्धांताच्या सिद्धीसाठी लिहिलेला ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीनंतर काही दिवसांनी ज्ञानदेवांनी ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ लिहिला. संतकवी हभप दासगणू महाराजांच्या त्यावरील टीकेसहित हा ऐकायला, वाचायला मिळणे हा अमृतमय अनुभव काही औरच! आजच्या सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. कल्याणीताई नामजोशी यांच्या वाणीतून माऊलींचे विचार ऐकत असताना, मला त्यातील माऊलींच्या बुद्धीबळाचा उल्लेख आवर्जून आठवत आहे. अमृतानुभवाच्याच जोडीने माऊलींचा मोक्षपटदेखील मला याच मे (उन्हाळी) महिन्याच्या निमित्ताने आठवतो. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला अध्यात्माची भारतीय क्रीडा प्रकारांची लीलया जोडणी करून दाखवतात.
श्री ज्ञानेश्वर माऊलीकृत श्री अमृतानुभव- भावार्थ मंजिरी अध्याय ९ मध्ये बुद्धीबळाचा ते दृष्टांत देताना सांगतात की,
दृष्टी दृष्य ज्यात दिसणेपण ।
ते मुळीच दृंमार्ग वस्तू पूर्ण ।
तेथे एकावाचून काहीच नाही ॥
पहा बुद्धिबळाचे खेळाप्रती ।
तेथे राजा प्रधान प्यादे हत्ती ।
ऐसे जरी मोहरी असती ।
परी काष्ठाविण काही नसे ॥
येथे नामरुप जरी वाढले आहेत ।
नाना परी परी त्या अवघ्या माघारी ।
एक काष्ठची वरले असे ॥
हत्तीची घ्यावया भेट ।
सरसावला जरी उंट ।
परी पाहता पडली गाठ ।
काष्ठालागी काष्ठाची ॥
राजा घोडा प्रधान ।
हे नामरुपाचे प्रकार जाण ।
पाहता अवघ्या ठाई ।
भरून काष्ठची आहे ॥
यात ते सांगतात की, अध्यात्मात दृश्य आणि द्रष्टा हे दोन्ही काही वेगळं नसते. काय राहतं तर दृंग्मात्र (पाहण्याचे सामर्थ्य) तेवढेच राहते. कारण, ते असल्याशिवाय जग पाहता येणार नाही आणि जे पाहिलं जाणार आहे, ते होणारं ज्ञान हे फक्त आत्मवस्तूचे होईल. त्यासाठी बुद्धीबळाचा ते दृष्टांत देतात. त्यात राजा, घोडा, प्यादी आहेत, हत्ती आहेत. हे सगळे जरी असले, तरीदेखील सगळं काय आहे, तर ते सगळं लाकूडच आहे. एका लाकडाशिवाय तेथे दुसरे काहीच नाही. म्हणजे आम्ही वर वर जे वेगळं वेगळं पाहतो, त्याच्या मागे जी वस्तू आहे, ती एक लाकूडच आहे. तसं हे सबंध दृश्य ज्यात आहे, ते सगळं दृष्य दिसायला जरी वेगळ वेगळं दिसत असलं, तरी त्या ठिकाणी एका आत्मवस्तूशिवाय दुसर काहीही भरून राहिलेलं नाही. म्हणून उपनिषदातही तेच आढळते की, एकटा नारायणच सर्वत्र भरून राहिलेला आहे.
बुद्धीबळाच्या दृष्टांतापाठोपाठ मला आठवतो-माऊलींचा मोक्षपट. मे महिन्याच्या सुट्टीत सगळी भावंडे जमली की सापशिडी, ल्युडो, पत्ते, कॅरम असे बैठे खेळ खेळले जातात. यात सगळ्यात प्रसिद्ध खेळ म्हणजे ’सापशिडी’ अर्थात ‘मोक्षपट.’ माऊली आणि निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या सोपानदेव आणि मुक्ताई यांचे मन रमावे, म्हणून संत ज्ञानेश्वर आणि वडीलबंधू संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा यामागील उद्देश. त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ’मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा वापर करावा लागतो. सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षड्रिपूंची नावे त्यांना देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे, तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पंचमहाभूतांचा जो देह असतो, तो देह आपण कसा सत्कारणी लावतो, हे ज्याच्या त्याच्या वर्तवणुकीवर अवलंबून असते. आपणच राजा असतो, तर आपणच प्यादी असतो. त्या सोंगट्या भगवंतानी मांडलेल्या आहेत, त्याचे संचालन कशा प्रकारे करायचे, हे भगवंताने आपल्यालाच ठरवायची मुभा या मनुष्यरुपी देहाला देऊन ठेवली आहे. मानवाव्यतिरिक्त ही मुभा अन्य पंचमहाभूतांना नाही. आपल्याला म्हणूनच मनुष्यजन्म मिळणे दुर्लभ असते. अमृतानुभवातील ज्ञानेश्वरांचा बुद्धीबळाचा पट तसेच मोक्षपट लावण्यापासून ती मोहरी योग्य जागी लावणं, त्याच्या योग्य चाली रचणे अशा ज्ञानासमवेतच भगवंत जागोजागी कसा भरलेला आहे, हेसुद्धा आपल्याला अशा क्रीडा प्रकारातून कळलं पाहिजे.
प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह म्हणजे, मृत्यूचा धाक देऊन मात करणे (हरवणे) हा बुद्धीबळाच्या खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून, जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही, त्यावेळी राजावर मात झाली, असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी, विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत. बुद्धीबळ खेळणार्या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धीबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. इस १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह (त्यावेळचा जगज्जेता) आणि ’आयबीएम’ कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धीमान-कुशल माणसाला बुद्धीबळात हरवणारी संगणक प्रणाली तयार करता येते, हे सिद्ध झाले.
खेळाडू स्वतःच्या राजास शह बसेल, अशी कोणतीही चाल प्रतिस्पर्धी खेळाडूला शक्यतो करू देत नाही. इतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळालाच, तर त्या खेळाडूला एका खेळीत शहातून बाहेर काढणारी चाल करावी लागते. जर अशी चाल खेळता येत नसेल, तर त्या खेळाडूची हार झाली, असे मानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसर्याच्या राजावर मात करून, त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्यांदा यशस्वी होतो तो जिंकला. म्हणून म्हणतात की, बुद्धीबळ हा बुद्धिमान लोकांचा खेळ आहे, ते युद्ध नव्हे.
आठी आठी चौसष्ट घरांच्या...
बुद्धीबळाच्या एकूण १२ डावांची असलेली अशी एक स्पर्धा या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आता खेळवली जात आहे. या स्पर्धेतील विजेता पुढील जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धेत आव्हानवीर असेल. अशा या बुद्धीबळपटूंना येथे आपण आपले आशीर्वाद देत, त्यांना शुभेच्छा देऊ. भारताचे स्त्री-पुरूष असे दोनही बुद्धीबळपटू या स्पर्धेत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही आव्हानवीर ठरला, तरी शेवटी विजेता असेल, तो आपला भारतच. चला तर मग आपण त्यांना आपल्या शुभेच्छा देत, त्यांना आपले आशीर्वाद देत म्हणू की, भारत माता की जय!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू)