नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला होता. त्यानंतर बांदा तुरुंगातील वरिष्ठ जेलर वीरेश राज शर्मा यांना धमक्या आल्या होत्या. यातच आता भाजप नेते मुदित शर्मा यांनाही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुदित शर्मा यांनी पोलिसांत धमकीची तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांदा कोतवाली भागातील भाजप नेते मुदित शर्मा हे पक्षाच्या प्रादेशिक आणि कायदा सेलचे सहसंयोजक आहेत. ते व्यवसायाने वकील असून मुदित शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. ०५ एप्रिल २०२४ रोजीत्यांना व्हॉट्सॲपवर तीन कॉल आले. हे कॉल्स सकाळी १०.२१, १०.२२ आणि १०.२७ वाजता आले, ज्यात त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान, 'अतीक, अशरफ आणि मुख्तार भाईजानच्या हत्येत तुमच्या शहरातील पंडितांचा हात असून आम्ही सोडणार नाही', अशी धमकी देण्यात आली आहे. आम्ही तुम्हा सर्वांना सावध करत आहोत. तुमच्या सर्व घरांचे पत्ते आमच्याकडे आहेत, अशी धमकी भाजप नेते मुदित शर्मा यांना देण्यात आली आहे. सदर धमकी फोन करून अज्ञाताकडून मिळाली आहे.
या धमकीनंतर मुदित शर्मा यांनी पोलिसांकडे सुरक्षेचे आवाहन केले असून धोक्याची भीती व्यक्त करत पोलिसांत तक्रार केली आहे. जिल्हा प्रशासनासोबतच त्यांनी डीजीपी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आपले प्राण वाचवण्याचे आवाहन केले आहे. सदर प्रकरणी बांदा कोतवाली पोलिसांनी कलम ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पाळत ठेवून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.