नारकोंडम धनेशाचे स्थानांतरण शक्य ? 'संवर्धन प्रजनन कार्यक्रमा'चा पर्याय

    05-Apr-2024   
Total Views |
narcondam hornbill


मुंबई (अक्षय मांडवकर) -
जगात केवळ नारकोंडम बेटावर आढळणाऱ्या नारकोंडम धनेश (narcondam hornbill) पक्ष्यांच्या स्थानांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी, या पक्ष्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पक्षी नारकोंडम बेटावर प्रदेशनिष्ठ आहे (narcondam hornbill). त्यामुळे भविष्यात या प्रजातीला रोगप्रसारासारख्या कारणांमुळे नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी 'संवर्धन प्रजनन कार्यक्रम' (कॉन्झर्वेशन ब्रिडिंग प्रोग्राम) राबवण्याचा पर्याय संशोधकांनी सुचवला आहे. (narcondam hornbill)
 
अंदमान द्वीपसमूहाच्या मुख्य बेटांपासून पूर्वेला १३५ किलोमीटर लांब नारकोंडम बेट आहे. जगात केवळ या बेटावरच आढळणाऱ्या नारकोंडम धनेश पक्ष्याच्या संरक्षणासाठी हे बेट अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून सामान्य माणसांना या बेटावर जाण्यास परवानगी घेणे बंधनकारक आहे. १९९८ ते २००२ या काळात झालेल्या गणनेनुसार या बेटावर धनेशांची संख्या केवळ ३३० ते ४३० एवढी होती. त्यानंतरच काळात वन विभागाने बेटाला दिलेल्या संरक्षणामुळे २०२० साली ही संख्या एक हजारच्या घरात गेली. 'नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन'चे वन्यजीव संशोधक रोहित नानिवडेकर, नवेंदू पागे, अभिषेक गोपाळ यांनी २०२० साली बेटावर राहून या धनेश पक्ष्याचा अभ्यास केला. त्यावेळी परवानगी देताना वन विभागाने नानिवडेकर यांच्यासोबत या पक्ष्याचे इतर बेटांवर स्थानांतरण करण्याची शक्यता तपासण्यासंदर्भात चर्चा केली. अभ्यासाअंती नानिवडेकर यांनी या चर्चेवर आधारित शास्त्रीय लेख 'ग्लोबल इकोलाॅजी अॅण्ड काॅन्झर्वेशन' या नियतकालिकामध्ये प्रकाशित केला आहे. गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी हा लेख प्रकाशित झाला. युक्ती तनेजा, नवेंदू पागे, अभिषेक गोपाळ आणि सरताज घुमान या लेखाचे सह-लेखक आहेत.

 
 
या पक्ष्याविषयीच्या सखोल माहितीचा अभाव असल्याने वन विभागाने भविष्यात या पक्ष्यांच्या स्थानांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याविषयी सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत, संशोधकांनी या लेखात मांडले आहे. नारकोंडम बेटांवर धनेश पक्ष्यांचे खाद्यफळ असणाऱ्या वट कुळातील (फायकस) झाडांची घनता ही प्रती हेक्टरमागे २७ झाडे, एवढी विपुल आहे. फायकस झाडांची एवढी घनता जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. अंदमान आणि नारकोंडम बेटांवरील वन अधिवास सारखाच असला तरी, नारकोंडम बेटासारखी फायकस झाडांची घनता अंदमानच्या बेटांवर आढळत नसल्याचे निरीक्षण लेखात नोंदवले आहे. तसेच अंदमानच्या मुख्य बेटावर 'अंदमान वूड-पिजन', 'अंदमान ग्रीन-पिजन', 'अंदमान बुलबुल' यांसारख्या फळे खाणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत त्याठिकाणी नारकोंडम धनेशाचे स्थानांतरण केल्यास फळे खाणाऱ्या पक्ष्यांमध्ये स्पर्धा वाढले आणि ज्याच्या परिणाम धनेशाच्या खाद्य उपलब्धतेवर होईल, असेही विवेचन लेखात करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत नारकोंडम बेटावर नारकोंडम धनेशाचे थेट भक्षक कोणीही नाही. याठिकाणी आढळणारी 'वाॅटर माॅनिटर' ही प्रजात या पक्ष्याचे अंडी आणि पिल्ले खात असल्याची शक्यता आहे. अशावेळी जर अंदमानच्या बेटावर नारकोंडम धनेशाचे स्थानांतरण केल्यास त्याठिकाणी असलेले शिकारी पक्षी आणि 'अंदमान पाम सिवेट'सारख्या भक्षकाचा धोका या पक्ष्याला आहे. याशिवाय सद्यपरिस्थितीत नारकोंडम बेटावरील धनेशांची अनुवांशिक विविधतेची गुणवत्ता फार कमी दर्जाची आहे. त्यामुळे या दृष्टीने देखील स्थानांतरण करताना विचार होणे गरजेचे असल्याचे निवदेन लेखात मांडण्यात आले आहे.

'संवर्धन प्रजनन कार्यक्रम' हा पर्याय
वन्य पक्ष्यांकडून होणाऱ्या 'एव्हियन इन्फ्लूएंझा'सारख्या प्रसंभाव्य रोगप्रसाराच्या घटना किंवा नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे नारकोंडम धनेशासारख्या प्रदेशनिष्ठ प्रजातीला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी 'संवर्धन प्रजनन कार्यक्रमा'सारखा पर्याय राबवला जाऊ शकतो. काही कारणामुळे जर नैसर्गिक अधिवासातील या पक्ष्यांची संख्या नष्ट झाल्यास, या प्रजातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी 'संवर्धन प्रजनन कार्यक्रमा'अंतर्गत आपण प्रयत्न करु शकतो. मात्र, या कार्यक्रमासाठी धनेशांच्या संवर्धन प्रजननाचा पुरेसा अनुभव असलेल्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे, त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांच्या निरीक्षणाअंतर्गत काम करणे आणि या कार्यक्रमासाठी आधुनिक सुविधा पुरवणे गरजेचे आहे. कारण, 'एक्स-सेटू' प्रजनन पद्धतींमध्ये धनेशाच्या काही प्रजाती या सहजपणे आपल्या जोड्या तयार करत नाहीत, असा अनुभव आहे. - रोहित नानिवडेकर, वन्यजीव संशोधक, नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.