‘पार्टनर इन करिअर’चीव्याख्या जपणारा उमेश कामत

Total Views |
Umesh Kamat

मराठी चित्रटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. दोघेही एकाच क्षेत्रात जरी असले त्यांचा वैयक्तिक प्रवास फार निराळा. नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी अभिनेता उमेश कामतने मनमोकळा संवाद साधला. यावेळी वैयक्तिक आयुष्य, प्रियाला करिअरमध्ये साथ यांसारख्या विषयांवर उमेशने अगदी भरभरुन गप्पा मारल्या. त्याचेच केलेले हे शब्दांकन...
 
उमेश कामत आणि प्रिया बापट ही मनोरंजनसृष्टीत गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत एक लोकप्रिय जोडपे. तेव्हा, एकाच क्षेत्रात असण्याचे फायदे तसे तोटेही आहेतच. त्याविषयी बोलताना उमेश सांगतो की, “आमचं जेव्हा लग्न ठरत होतं, तेव्हा प्रिया ज्या मालिकेत काम करत होती, त्या दिग्दर्शकांना आमच्या नात्याबद्दल समजले. आम्ही लग्न करणार आहोत, हेदेखील त्यांना माहीत होते. त्यावेळी ते दिग्दर्शक असे म्हणाले होते की, बघा हा तुमचा अभिमान होता कामा नये. कारण, एकाच क्षेत्रात काम करत असताना तुमची प्रगती लोकांच्या डोळ्यात खुपत असते. त्यामुळे मग ‘ट्रोल’ करणे किंवा काड्या टाकणे या गोष्टी होतच असतात. मात्र, आम्ही याकडे लक्ष न देता आमच्या करिअरच्या वाटा निवडून, त्यावर चालत सुटलो. सुदैवाने प्रिया हिंदीतही उत्तम भूमिका करत आहे आणि माझा कधीही हिंदीतचं काम करावे किंवा हिंदीतच जावे, असा अजिबात अट्टहास नव्हता. त्याचे कारण असे की, माझे ध्येय हे फार वेगळे आहे. महत्त्वाचे म्हणजे, हिंदी किंवा कोणतीही ठरावीक भाषाच वरचढ राहिली नसून, प्रत्येक भाषेतील कलाकृती ही हिरो झाली आहे.

 मराठी, बंगाली, गुजराती किंवा अन्य कोणत्याही भाषेतील मनोरंजनसृष्टी मोठी होत आहे याचा नक्कीच कलाकार म्हणून आनंद आहे. पण, मुळात हिंदीत काम करण्याची फारशी खुमखुमी नसल्यामुळे आम्ही दोघेही कलाकार असलो तरी आमच्यात कधी स्पर्धा किंवा हेवेदावे नव्हतेच.” प्रिया सध्या हिंदी वेबसीरीज आणि चित्रपटात काम करताना तर दिसतेच, पण रंगभूमीवर तिचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटकही गाजत आहे. त्यामुळे तिच्या आणि स्वत:च्या कार्यशैलीबद्दल बोलताना उमेश म्हणाला की, “आम्ही दोघेही रंगभूमी, मालिका या माध्यमांतूनच चित्रपटांपर्यंत पोहोचलो आहोत. माझ्या प्रत्येक कामाकडे आणि त्या भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा आहे आणि प्रियाची काम करण्याची पद्धत जराही विश्रांती न घेता करण्याची आहे. त्यामुळे तिला पाहून मला खरं तर ऊर्जा आणि उमेद मिळते. तिच्या याच कामाप्रतीच्या समर्पणाचे मला कौतुक आणि अभिमान नक्कीच आहे.”नवरा म्हणून प्रियाचा आदर आणि अभिमान आहे असे म्हणत उमेश म्हणतो की, “प्रियाच्या बाबतीत एक सांगेन की, ती कोणतीही कलाकृती स्वीकारताना फार विचार करून निवडते. तिच्या मनासारखी जर का ती गोष्ट झाली नाही किंवा तिला वाटत असेल की, ती साध्य होणार नाही, तर पदरी दुसरं काम नसेल तरी समोर आलेले कामदेखील नाकारण्याची तिच्यात हिंमत आहे. कारण, मनोरंजन क्षेत्र हे फार चलबिचल आहे.

आज काम आहे, तर उद्या नाही; पण अशा परिस्थितीही एखाद्या कामाला ‘नाही’ म्हणण्यासाठी हिंमत असावी लागते, जी प्रियामध्ये आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झाले, तर मधल्या काळात मला भूमिका किंवा चित्रपट आवडला नसला तरी परिस्थिती किंवा बर्‍याच गोष्टींचा विचार करून, मी कामे स्वीकारली आहेत. पण, नाटकांच्या बाबतीत मी फार कटाक्षाने विचार करत निवड करतो. मालिकांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय माझा असतो. पण, चित्रपटांच्या बाबतीत मला निर्धास्तपणे निर्णय घेण्याची मुभा नव्हती किंवा नाही, असे मी म्हणेन.” पुढे उमेश म्हणाला की, प्रिया आणि माझ्यात आत्तापर्यंत मतभेद झाले नाहीत. आम्ही एकमेकांशी कामाच्या बाबतीत गोंधळलो की आवर्जून संवाद साधतो आणि एकमेकांना मदत करतो.” ‘शुभं करोति’, ‘असंभव’, ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, अशा अनेक अजरामर मालिकांमध्ये उमेश कामतने महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. त्या जुन्या आठवणींना आणि मालिकांबद्दल बोलताना उमेश म्हणाला की, “आम्हाला अभिमान आणि गर्व आहे की, आम्ही अशा उत्तम कलाकृतींचा भाग होतो. आजही त्या मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत, त्यांच्या कथा मनात रुजलेल्या असून शीर्षक गीते ओठांवर आहेत. त्यामुळे आजीवन लक्षात राहणार्‍या मालिकांचा आम्ही अविभाज्य भाग होतो, याचं खरंच कौतुक वाटतं. पण, त्या सर्व मालिकांची मजा काही औरच होती.”


रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.