काँग्रेसची ‘घर घर...’

    04-Apr-2024   
Total Views |
Ghar Ghar Guarantee

आता काँग्रेसने ‘घर घर गॅरेंटी’ अभियान सुरू केले आहे. निवडणुका आल्या की, काँग्रेस काय काय करेल, याच्याही बर्‍यापैकी ताळेबंदाचा अंदाज मराठी माणसालाच नव्हे, तर सगळ्या भारतीयांना आहेच. त्यामुळे काहींचे म्हणणे की, घर घर ही माणसाचा मृत्यू होताना माणसाला लागते. त्या घर घरचा आणि या ’घर घर गॅरेंटी’चा काही संबंध आहे का? या ’घर घर गॅरेंटी’बद्दल काही लोकांचे म्हणणे आहे की, काँग्रेस आता संभ्रमित झाली आहे. मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील, याची काँग्रेसलाच पक्की खात्री असावी. त्यामुळे मोदी आणि भाजप जे काही करतात. त्याचा मागोवा घेत, काँग्रेस त्यांचे कार्ड खेळते. उदाहरणार्थ, ’मोदींची गॅरेंटी’ असे भाजप म्हणते. भाजपचे हे म्हणणे तथ्य आणि सत्यालाही धरून. कारण, देशातले कोट्यवधी लोक मोदींचे म्हणणे ऐकतात, हे सगळ्या जगाने पाहिले. संदर्भासाठी मालदीव पर्यटन किंवा कोरोना काळातले जनतेने थाळी वाजवणे किंवा स्वदेशी संवर्धनासाठी उत्सव, मंगल कार्यक्रम देशात करायचे आवाहन, या सगळ्यांबाबत मोदी जे जे म्हणाले, ते ते कोट्यवधी भारतीयांनी उत्स्फूर्तपणे केले.मोदी म्हणाले की, ’ये मोदी की गॅरेंटी हैं।’ त्यानंतर काँग्रेसने लगेच ’घर घर गॅरेंटी’ म्हणत, काँग्रेस आठ कोटी कुटुंबांना भेटणार असल्याचे जाहीर केले. त्यात म्हणे, पाच न्याय सिद्धांत असणार आहेत. ते म्हणजे ’युवा न्याय’, ’नारी न्याय’, ’किसान न्याय’, ’श्रमिक न्याय’ आणि ’हिस्सेदारी न्याय’ वगैरे. पण, जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा काँग्रेसने तर म्हटले होते की, देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा. काँग्रेस जेव्हा हिस्सेदारी, न्याय वगैरे म्हणते, तेव्हा त्यांना देशातील बहुसंख्य हिंदूंसाठी हा न्याय अपेक्षित आहे का? रामसेतू आणि राममंदिराबद्दल काँग्रेसने जी हिंदूविरोधी भूमिका घेतली, ती भूमिका कोणत्या न्यायातून घेतली? किंवा इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली, ते सगळे कोणत्या न्यायाचा भाग होता? तो तसला ‘न्याय’ काँग्रेसला अपेक्षित आहे का? मागासवर्गीय समाजाचे रामदास आठवले यांचे सामान रस्त्यावर फेकताना, काँग्रेसने जो न्याय दाखवला, तो न्याय काँग्रेसला अपेक्षित आहे का? ’घर घर गॅरेंटी’ सांगणार्‍या काँग्रेसला या आणि अशा अनेक घटनांमुळे येणार्‍या निवडणुकीत घर घर लागणार, हे नक्की!

‘ईडी’, ‘सीबीआय’चा ताबा

'ईडी’, ‘सीबीआय’ म्हणजे काही आठवडी बाजार आहे का? की फाडली दहा रुपयांचीं पावती आणि जमवला गल्ला. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा ताबा असा कोणालाही देता येतो का? मात्र, संजय राऊत नुकतेच म्हणाले की, “आठ दिवस ’ईडी’ ‘सीबीआय’ माझ्याकडे द्या, मला दाखवायचे आहे की, या यंत्रणा कशा काम करतात.“ आता यावर लोकांचे म्हणणे आहे की, संजय राऊत खरे हुशार. त्यांना माहिती आहे की, महाविकास आघाडी काही जिंकणार नाही, सत्ताच मिळणार नाही, मंत्रिपद मिळणार नाही. हे ठाम माहिती असल्यामुळेच, संजय राऊत असे म्हणाले असतील. ’ईडी’, ‘सीबीआय’ ताब्यात द्या, असे संजय राऊत का म्हणाले? यावर काहींचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून, ते दिवसभर ’ईडी’, ‘सीबीआय’चा मंत्र जपत असतात. त्यामुळे ’ईडी’, ‘सीबीआय’बद्दल त्यांच्या मनात प्रेम दाटले आणि ते ’ईडी’, ‘सीबीआय’ त्यांच्याकडे द्या म्हणत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, संजय राऊतांना मागे तुरुंगातही जावे लागले होते. ’ईडी’, ‘सीबीआय’च्या कामामुळे ते प्रभावित झाले आहेत. त्यामुळेच आठ दिवसांसाठी का होईना, त्यांना ’ईडी’, ‘सीबीआय’चा ताबा त्यांच्याकडे हवा आहे. असो. सध्या भ्रष्टाचारींवर कारवाई होत आहे. वर्षोनुवर्षे भ्रष्टाचार करणार्‍यांची पापे उघडी पडत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचार्‍यांशी संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. ते या भ्रष्टाचार्‍यांचा बचाव कसा करायचा, या विचाराने त्रस्त आहेत? त्यातूनच मग हे लोक ’ईडी’, ‘सीबीआय’ निःपक्षपाती काम करत नाही, असे म्हणतात आणि लोकांना भ्रमित करतात. यातून ते भ्रष्टाचार्‍याला सहानुभूती मिळवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण, त्यामुळे ’ईडी’ आणि ‘सीबीआय’च्या कारवाईबद्दल संशय घेणार्‍या व्यक्तींच्या भूमिकेबद्दलही प्रश्न निर्माण होतो. कारण, ’ईडी’ किंवा ‘सीबीआय’ म्हणा, त्या काय खासगी संस्था आहेत की, जिथे आपल्या आवडीनुसार पुरावा नसताना कुणावरही कारवाई होईल? ’ईडी’, ‘सीबीआय’मार्फत ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यात काही तरी तथ्य असेल म्हणूनच. पण, तरीसुद्धा ’ईडी’, ‘सीबीआय’ पक्षपात करते, असे म्हणत भ्रष्टाचारात लिप्त असलेले लोक थयथयाट करतात. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना ’ईडी’ आणि ‘सीबीआय’चा ताबा का बरं हवा असेल?

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.