ईटीएफ : गुंतवणुकीचा एक सक्षम पर्याय

    04-Apr-2024   
Total Views |
ETFs

‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (ईटीएफ) हा म्युच्युअल फंडासारखाच गुंतवणुकीचा एक प्रकार. ‘सेबी’ अर्थात ‘सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या १९९६ च्या कायद्याअंतर्गत म्युच्युअल फंडाची एक योजना म्हणून ‘ईटीएफ’ ओळखला जातो. म्युच्युअल फंड रेग्युलेशनच्या नियमन २(१) जेबीनुसार, ‘ईटीएफ’ अशी एक म्युच्युअल फंड योजना आहे, जी शेअर बाजारात व्यवहार होणार्‍या रोख्यांच्या निर्देशांकांच्या प्रमाणात संबंधित रोख्यांमध्येच गुंतवणूक करते. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

'ईटीएफ’चे युनिट शेअर बाजारात ‘लिस्ट’ होतात व त्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार शेअर बाजारात होतात. म्युच्युअल फंड फक्त दिवसांच्या शेवटी त्या फंडाच्या निव्वळ ‘एनएव्ही’ (नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू)च्या आधारे खरेदी किंवा विकले जाऊ शकतात, तर ‘ईटीएफ’ची शेअर बाजारात नियमित होणार्‍या शेअरप्रमाणे खरेदी-विक्री होऊ शकते. ‘ईटीएफ’मधून गुंतवणूकदारास लाभांश आणि भांडवली नफा या दोन्ही स्वरुपात उत्पन्न मिळू शकते.‘ईटीएफ’मुळे गुंतवणूकदारास प्रत्यक्षपणे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करता, एकाच वेळी कंपन्यांच्या विविध शेअर्स किंवा रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि निर्देशांक किंवा ‘निफ्टी’सारख्या निर्देशांकांचा मागोवा घेण्याची किंवा पाठपुरावा करण्याची संधी मिळते. त्यामुळे जर ‘ईटीएफ’चे युनिट्स विकत घेतल्यास, गुंतवणूकदारास सुरुवातीस एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक छोटासा भाग मिळतो. भारतीय कंपन्या किंवा परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मर्यादित मालकी मिळविण्याकरिता, ‘ईटीएफ’ खरेदी करता येते. ‘ईटीएफ’ म्हणजे प्रत्येक शेअर स्वतंत्रपणे खरेदी न करता, विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक राजमार्ग आहे.
 
शेअर बाजार निर्देशांकाशी निगडित असणार्‍या ‘इक्विटी ईटीएफ’मध्ये निर्देशांकाप्रमाणे संलग्न शेअर्समध्ये १०० टक्के गुंतवणूक केली जाते आणि या गुंतवणूक विभागणीनुसार, गुंतवणूकदार नफा-नुकसान सोसतात. निर्देशांका-व्यतिरिक्त काही पर्यायी असणार्‍या शेअर आणि रोख्यांमध्ये पाच टक्क्यांपासून २०-२२ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. ‘नॉन-इक्विटी ईटीएफ’मध्ये ‘डेट ईटीएफ’, ‘गोल्ड/सिल्व्हर ईटीएफ’ व ‘इंटरनॅशनल ईटीएफ’चा समावेश होतो. ‘डेट ईटीएफ’ हे नावाप्रमाणेच विशेषत: बॉण्ड्स व इतर डेट गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करतात. सोने/चांदीचे ‘ईटीएफ’ सोने आणि चांदीच्या सराफामध्ये गुंतवणूक करतात. त्यांचे मूल्य धातूच्या किमतींशी जोडलेले असते. ‘आंतरराष्ट्रीय ईटीएफ’ परदेशात सूचीबद्ध असलेल्या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.‘ईटीएफ’ ही विविध कंपन्यांतील शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक असते.गुंतवणूकदार स्वतंत्रपणे शेअरमध्ये गुंतवणूक करून जो लाभांश मिळवितो, तो ‘ईटीएफ’मध्येही मिळतो. यात गुंतवणूकदार स्वतःच्या खात्यात लाभांश जमा करून घेऊ शकतो किंवा ‘ईटीएफ’मध्ये पुन्हा गुंतवूणकही करू शकतो. तसेच, गुंतवणूकदाराला विक्रीच्या वेळी जास्त परताव्याचा पर्यायही स्वीकारता येऊ शकतो. हे लाभांश करपात्र आहेत. कर गुंतवणूकदाराच्या प्राप्तिकराच्या स्लॅबनुसार भरावा लागतो. ‘ईटीएफ’च्या युनिट्सची विक्री किंवा मुदत पूर्ततेवर करपात्र भांडवली नफा होतो.

भांडवली नफ्यावर आकारला जाणारा करांचा दर ‘ईटीएफ’च्या प्रकारावर व कालावधीनुसार ठरतो. जेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारात ‘ईटीएफ’ची खरेदी-विक्री करतो, तेव्हा त्याचे मूल्य शेअर बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर ठरते. भांडवली नफा दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीचा असू शकतो आणि त्यासाठीची कररचना वेगळी असते आणि ती ‘ईटीएफ’ प्रकारावरदेखील अवलंबून असते. भांडवली नफा दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीचा असू शकतो आणि त्यासाठीची कररचना वेगवेगळी आहे आणि ती ‘ईटीएफ’च्या प्रकारावरदेखील अवलंबून असते, तर ‘इक्विटी ईटीएफ’ १२ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ठेवल्यानंतर विकला गेला, तर परिणामी नफा हा अल्पकालीन भांडवली नफा मानला जातो. भांडवली नफ्याची आकडेमोड करताना गुंतवणूकदार विकत घेतानाची किंमत व ट्रान्स्फरसाठी होणारा खर्च वजा करू शकतात.‘इक्विटी ईटीएफ’ हे ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ आहेत, जे प्रामुख्याने शेअर्स किंवा संबंधित गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात. जर, एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी मालकी हक्क असलेल्या शेअर विक्रीतून मिळालेला भांडवली नफा हा अन्य मुदतीचा भांडवली नफा समजला जातो, तर जर एका वर्षांपेक्षा जास्त कालावधींसाठी मालकी हक्क असलेले शेअर विकून मिळालेला भांडवली नफा हा दीर्घकालीन भांडवली नफा समजला जातो.

प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ११२ ए’नुसार सर्व दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे आणि एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर दहा टक्के दराने अधिक लागू अधिभार व इतर उपकरांसह प्राप्तिकर आकारला जातो. प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम १११ ए’नुसार अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के कर, लागू अधिकार आणि इतर उपकरांसह लागू आहे. ‘नॉन इक्विटी ईटीएफ’च्या बाबतीत मालकी हक्काचा कालावधी विचारात घेतला जात नाही. नफा नेहमीच अल्पकालीन भांडवली नफा समजला जातो. दि. १ एप्रिल, २०२३ पासून प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम एए’अंतर्गत ही विशेष पद्धती लागू करण्यात आली आहे. ‘कलम ५० एए’नुसार, विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या जे देशांतर्गत कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करीत नाहीत, अशा युनिटच्या हस्तांतरणामुळे होणारा भांडवली नफा किंवा संलग्न डिबेंचर्समधून होणारा कोणताही भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून समजला जातो. त्यानुसार अशा ‘ईटीएफ’मधून होणारा नफा हा कालावधी विचारात न घेता, अल्प मुदतीचा भांडवली नफा समजला जातो व त्यानुसार कर भरावा लागतो.

सोने, डेट आणि इतर ‘ईटीएफ’साठी करदायित्व समान आहे. परंतु, या प्रकारात दीर्घकालीन आणि अन्य मुदतीचा भांडवली नफा वेगळ्या निकषांवर ठरविले जाते. तीन वर्षांपर्यंचा अल्प मुदतीचा त्याहून अधिक कालावधीचा, दीर्घ मुदतीचा. दीर्घकालीन नफ्यावर इंडेक्सेशन विचारात घेऊन २० टक्के दराने कर भरावा लागतो. संतुलित ‘ईटीएफ’ किंवा मालमत्ता वाटप ‘ईटीएफ’च्या बाबतीत जे देशांतर्गत कंपन्यांच्या ‘इक्विटी’मध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त व ६५ टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करतात, अशा ‘ईटीएफ’च्यामुळे होणारा भांडवली नफा करपात्र असतो. ३६ महिन्यांहून अधिक कालावधीसाठी दीर्घकालीन भांडवली नफा जास्त इंडेक्सेशन विचारात घेऊन २० टक्के दराने कर भरावा लागतो.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.