नको जल्प विकल्प, हवा सत्य संकल्प!

    03-Apr-2024   
Total Views |
resolution

सत्य संकल्प हा शाश्वताची दिशा दाखवतो. अशाश्वताची इच्छा करण्यापासून मिळणारे फळ कायम स्वरूपाचे असणार नाही, हे उघड आहे. या जगातील व्यवहाराला स्थळ आणि काळाचे बंधन असते. त्यामुळे जगापासून मिळणारे सुख-समाधान यांनाही बंधन पडते. आज वाटणारे सुखाचे घटक, परिस्थिती बदलली की कालांतराने सुखाचे वाटत नाहीत. स्थळाचेही तसेच आहे. ठिकाण बदलले की पूर्वीचे सुख नाहीसे होते. या जगापासून उत्पन्न होणारे संकल्प हे मनाला स्वार्थी व अहंकारी होण्यास मदत करतात. मन अशा संकल्पात रमू लागले की, ते अहंकारी होऊन स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाही.

समर्थांनी मागील श्लोेकात रती नायिकेचा पती जो कामदेव त्याचा जनमानसावरील प्रभाव वर्णन केला आहे. ही रतिमदनाची जोडी कामवासना अबाधित ठेवते, असे मानले जाते. कामवासनेच्या ठिकाणी मोठे सामर्थ्य असल्याने ती माणसाला आपल्या अधिपत्याखाली ठेवून भ्रष्ट मार्गाला लावते.हे आपण नित्याच्या जीवनात पाहतो. जगाच्या दृष्टीने चांगली असणारी माणसे वासनेच्या आहारीगेल्याने त्यांचे जीवन भ्रष्ट झालेल्यांची अनेक उदाहरणे सांगता येतात. कामवासना भोगाच्या आशेपायी माणसे आपले शहाणपण विसरतात. वासनापूर्तीच्या कल्पनेपायी, प्रसंगी लाचारी पत्करण्याची माणसाची तयारी असते. याचा अर्थ अनेक कष्टांनी मिळवलेले शहाणपण, सद्बुद्धी, समाजातील मानप्रतिष्ठा क्षणार्धात नष्ट करण्याचे सामर्थ्य कामवासनेच्या ठिकाणी असते. कामवासना प्रथम माणसाच्या मनावर, वृत्तीवर परिणाम करून माणसाला आपल्या कह्यात घेते. वृत्तीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे सामर्थ्य बुद्धीत, विवेकात असते. वृत्तीच्या पलीकडे जाण्याला ‘मनातीत होणे’ असे म्हणतात. यासाठी आपण मनातीत होऊन तटस्थपणे कामवासनेच्या दुष्परिणामांना जाणले, तर ही वासना दूर ठेवता येते. स्वामींनी मागील श्लोक क्र. १२९ मध्ये मनातीत होण्याचा सल्ला मनाला दिला आहे, तो यासाठीच!
 
मनाची सर्वसाधारणपणे काम करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. मनात वासना, कामना, इच्छा, आकांक्षा निर्माण झाल्यानंतर प्रथम मन त्याच्या पूर्ततेसाठी संकल्प करते. एकदा संकल्प तयार झाला की, त्यानुसार कृती करण्याचा आदेश मन शरीराला देते अथवा देहाकडून तशी कृती घडवून आणते. संकल्प चांगला किंवा वाईट कसाही असू शकतो. आयुष्यात साध्याला महत्त्व असते. मनाद्वारे केलेल्या संकल्पाने ध्येयाकडे, साध्याकडे जाण्यासाठी कष्ट करण्याची, मार्ग शोधण्याची मनाची तयारी होते. तथापि, मागील श्लोक क्र. १२९ मध्ये स्वामींनी वृत्तीवर ताबा मिळवण्यासाठी मनाला मनातीत होण्याचा सल्ला दिला आहे. मनातीतझाल्याने वृत्तीने लुडबुड केली तरी समाधानात फरक पडत नाही. आपल्या समाधानाच्या प्रक्रियेत अडथळा आणणारा आणखी एक घटक म्हणजे, विकल्प अथवा संशयीवृत्ती. सर्वच बाबतीत संशय घेण्याची सवय लागली, तर माणूस असलेलेही समाधान हरवून बसतो. आपल्या ध्येयापासून दूर फेकला जातो. आपले ध्येय गाठण्यासाठी, समाधान टिकवण्यासाठी संकल्पाप्रमाणे विकल्प, संशय निर्माण करू पाहणार्‍या घटनांकडे, त्यांचा वृत्तीवर होणार्‍या परिणामांकडे लक्ष ठेवावे लागते. स्वामींनी यापुढील श्लोकात हा उपदेश स्पष्ट शब्दांत केला आहे आणि त्यासाठी देवाला एकांतकाळी कसे भजावे, हे सांगितले आहे.


मना अल्प संकल्प तो ही नसावा।
सदा सत्य संकल्प चित्ती वसावा।
जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा।
रमाकांत येकांतकाळी भजावा॥१३०॥

मनोव्यापार कसा चालतो ते वर थोडक्यात पाहिले. मनात आशा, आकांक्षा, इच्छा, वासना, कामना इत्यादी निर्माण झाल्याने मन विविध संकल्प करते. संकल्प चांगला असेल, श्रेष्ठ असेल तर त्याच्या साहाय्याने ध्येय गाठण्यात जीवनाचे सार्थक आहे. तथापि प्रपंचात वावरत असताना आपला अनेकांशी संपर्क येतो. सभोवताली जे घडत आहे, त्याचा मनावर परिणाम होत असतो. लोक कसे वागतात, कसा आनंद साजरा करतात हे पाहिल्यावर आपणही तसेच करून पाहावे असे मनाला वाटणे स्वाभाविक आहे. त्या घटकांचे आकर्षण वाटून आपण लोकांचे अनुकरण करू लागतो. त्यातून जे संकल्प तयार होतात, त्यात क्षूद्र, अल्प संकल्पही मोठ्या प्रमाणात असतात. मनाला उपदेश करताना स्वामी या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगत आहेत की, हे मना, तू अल्पस्वल्प संकल्प करण्याच्या भानगडीत पडू नकोस. क्षूद्र संकल्प करण्यात आपण मनाची शक्ती वाया दवडीत असतो. आता संकल्प करणे हा मनाचा स्थायीभाव असल्याने मन काही ना काहीतरी संकल्प करीत राहणार, तेव्हा संकल्पच करायचा तर मग तो नेहमी सत्यसंकल्पच करावा. सत्यसंकल्पालाच आपल्या चित्तात जागा द्यावी. सत्यसंकल्प आपल्याला चांगल्या ध्येयाप्रती घेऊन जातो. क्षूद्रसंकल्पातून आनंदाचे मायाजाळ दिसत असले तरी अंतिमः ते दुःखाला कारणीभूत होते. काळाचा अपव्यय होऊन मनस्तापाशिवाय काही हाती लागत नाही.

सत्य संकल्प हा शाश्वताची दिशा दाखवतो. अशाश्वताची इच्छा करण्यापासून मिळणारे फळ कायम स्वरूपाचे असणार नाही, हे उघड आहे. या जगातील व्यवहाराला स्थळ आणि काळाचे बंधन असते. त्यामुळे जगापासून मिळणारे सुख-समाधान यांनाही बंधन पडते. आज वाटणारे सुखाचे घटक, परिस्थिती बदलली की कालांतराने सुखाचे वाटत नाहीत. स्थळाचेही तसेच आहे. ठिकाण बदलले की पूर्वीचे सुख नाहीसे होते. या जगापासून उत्पन्न होणारे संकल्प हे मनाला स्वार्थी व अहंकारी होण्यास मदत करतात. मन अशा संकल्पात रमू लागले की, ते अहंकारी होऊन स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाही. समर्थांच्या मते, परमेश्वर ब्रह्मस्वरूप हे शाश्वत आहे. तेव्हा मनातील स्वार्थ व अहंकार काढून टाकून त्याला शाश्वत परब्रह्माकडे वळवले, तर अविनाशी समाधान मनाला सापडते. या ध्येयप्राप्तीमुळे मानवी जीवनाचे सार्थक होते. या ध्येयप्राप्तीच्या मार्गातील दोन विक्षेपांचा समर्थ येथे उल्लेख करतात. ते म्हणजे जल्प आणि विकल्प. त्यांचा त्याग करायला स्वामींनी सांगितले आहे.

जल्प म्हणजे विनाकारण केलेली बडबड. काही लोकांना ध्येय सापडल्याचे इतके कौतुक असते की, आपले महत्त्व वाढावे म्हणून ते आजूबाजूच्या मंडळीत सतत त्याच विषयावर बडबड करीत असतात. अशाने लोक त्याविषयी नाना तर्‍हेच्या शंका उपस्थित करतात. त्या ऐकल्यावर, त्याच्या मनात साध्याविषयी संशय निर्माण होतात. याला ‘विकल्प’ असे म्हणतात. आपण करतो ते बरोबर आहे ना? अशी शंका निर्माण झाल्याने मन ध्येयापासून डळमळीत होते. संशय बाहेरूनच येतात असे नव्हे, तर काही माणसांना स्वतःच विकल्प निर्माण करण्याची सवय असते. त्या सवयीचा त्याग करावा. परमेश्वर प्राप्ती हे एकदा ध्येय ठरले, तर एकांतात राहून, परमेश्वर चिंतन करावे. ‘रमाकांत एकांतकाळी भजावा’ असे स्वामींनी म्हटले आहे. एकांतात आपोआप बडबड कमी होईल. इतरांनी केलेले मतप्रदर्शन तेथे नसल्याने विकल्प, संशय हे थोपवले जातील. चित्त विचलित होणार नाही. मन एकाग्र होण्यास मदत होईल. परमेश्वर एकांतकाळी भजावा, असे सांगून स्वामी एकांताला कसे महत्त्व देतात, याचे विवेचन पुढील लेखात पाहता येईल. (क्रमश:)


-सुरेश जाखडी



सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..