मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी सत्तेच्या लालसेपोटी गळ्यात काँग्रेसचं चंगळसुत्र बांधलं आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. सामना वृत्तपत्रात मंगळसुत्राबाबत लिहिलेल्या अग्रलेखावर त्यांनी ठाकरे आणि राऊतांवर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "सर्वज्ञानी संजय राऊत मंगळसूत्राच्या ओव्या गाण्याचा तुम्हाला हक्क नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा थोबाड उघडलं त्या गटारातून महाराष्ट्रातील महिलांसाठी शिव्याशापच बाहेर आलेले आम्ही पाहिलेत. नवनीत राणांना नाची म्हणत हिणवून तुम्ही तिच्या मंगळसुत्राचा अपमान केला. जाज्वल्य हिंदुत्वासाठी शिवसैनिकांनी घरदार सोडून मेहनत केली. प्रसंगी रक्तसुद्धा सांडलं. पण तुम्ही महाविकास आघाडीकडे जाऊन बसलात आणि त्या शिवसैनिकांच्या वीर पत्नीचा आणि तिच्या मंगळसुत्राचा अपमान केला आहे."
"मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा करुन तुम्ही अनेक इंच मंगळसुत्र हिरावून घेत त्यांना पोरकं केलंत. एवढंच नाही तर डोक्यावर हक्काचं छप्पर येईल, या आशेने तुमच्याकडे डोळे लावून बसलेल्या मराठी आया-बहिणींना तुम्ही पत्राचाळ घोटाळा करून मंगळसूत्र गहाण टाकायची वेळ आणलीत. त्यामुळे तुमचा आणि महिलांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या मंगळसूत्राचा काहीही संबंध नाही. तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या नावाने जे गळ्यात बांधून घेतलंय, त्याला चंगळसूत्र म्हणतात," असेही त्या म्हणाल्या.