"उबाठाची १०० टक्के काँग्रेस झाली! ठाकरे परिवार पंजाला मतदान करणार!"
28-Apr-2024
Total Views | 77
कोल्हापूर : उबाठाची १०० टक्के काँग्रेस झाली असून आणि बाळासाहेबांचा परिवार आता पंजाला मतदान करणार आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शनिवारी कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, असं बाळासाहेब म्हणाले होते. पण आज त्यांचा मुलगा, त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे. हे या राज्याचं दुर्दैव आहे. हे बघून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ती ते जाहीरपणे सांगत आहेत. त्यांना यामध्ये अभिमान वाटतो."
"खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणायचीदेखील लाज वाटते. हिंदुहृदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरु लागली आहे. आता उबाठाची १०० टक्के काँग्रेस झालेली आहे. त्यामुळे देशाचा कणखर आणि कर्तुत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे. देशात उकाडा वाढल्यावर परदेशात पळणारा नेता आपल्याला पाहिजे की, दहा वर्षांत एकही सुटी न घेता २४ तास काम करणारा प्रधानमंत्री पाहिजे?," असा सवाल त्यांनी उपस्थित जनतेला केला.
ते पुढे म्हणाले की, "आईच्या मृत्यूचं दु:ख विसरून स्वत:ला देशसेवेसाठी वाहून घेणारा प्रधानमंत्री आपल्याला हवा आहे. आज आईच्या पदराला धरून राजकारण करणारा प्रधानमंत्री आपल्याला नको आहे. परदेशात देशाची बदनामी करणारा नको तर तिथे देशाचा सन्मान वाढवणारा प्रधानमंत्री आपल्याला हवा आहे. असा एकच नेता देशात आहे आणि त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे," असेही ते म्हणाले.