विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही, तर...; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला
27-Apr-2024
Total Views | 51
कोल्हापूर : विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही तर आपला एक मुद्दा संपला याचं त्यांना दु:ख आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "निर्यातबंदी झाल्यानंतरही केंद्र सरकारने सातत्याने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळी निर्यातीची लिमीट ठरवून परवानगीदेखील दिली. आता तर याठिकाणी खूप मोठी निर्यातीची परवानगी दिली आहे. विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही. आपला एक मुद्दा संपला याचं त्यांना दु:ख आहे. शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचंही त्यांना दु:ख आहे. शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे याबद्दल खरंतर त्यांनी आनंद व्यक्त करायला हवा होता. पण त्यांनी आनंद व्यक्त न करता ते केवळ दु:ख व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही तर ते फक्त राजकारण करत आहेत," असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर असून तिथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, कोण संजय राऊत?. ते प्रतिक्रिया देणारे व्यक्ती आहेत का?" असा खोचक सवाल त्यांनी केला.
नुकतीच केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली असून बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस सहा देशांमध्ये कांद्याची निर्यात केली जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.