"काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी चालूच राहिल" - मोदींचा पित्रोदांवर घणाघात

    24-Apr-2024
Total Views |
 PM Modi
 
रायपूर : छत्तीसगडच्या सुरगुजामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. येथे त्यांनी वारसा कराबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास त्यांची आयुष्यभराची कमाई काढून घेईल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी लोकांना दिला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसची लूट आयुष्यात आणि आयुष्यानंतरही सुरूच असते.
 
सुरगुजा येथे, पंतप्रधान मोदींनी बुधवार, दि.१८ एप्रिल २०२४ भाजप उमेदवार रेणुका सिंह यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित केले. या काळात त्यांनी संपत्तीचे पुनर्वितरण आणि मृत्यूनंतर मालमत्ता जप्ती या मुद्द्यांवरून काँग्रेसला कोंडीत पकडले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारतविरोधी लोकांना इंडी आघाडीचे कमकुवत सरकार हवे आहे ज्यात भ्रष्टाचार चालू राहील आणि प्रत्येकजण एकमेकांशी लढत राहील. काँग्रेसच्या काळात नक्षलवाद आणि दहशतवाद पसरला. काँग्रेसचा चुकीचा कारभार आणि निष्काळजीपणा हेच देशाच्या बरबादीचे कारण आहे."
 
 
नक्षलवाद्यांना शहीद म्हणणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर या काँग्रेसचा सर्वात मोठा नेता अश्रू ढाळतो. त्यामुळे काँग्रेसने देशाचा विश्वास गमावला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगच्या विचारसरणीचे प्रतिबिंबित करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
ते म्हणाले की, संविधान बनवताना धर्माच्या नावावर आरक्षण द्यायचे नाही, असे ठरवले होते, मात्र मतपेढीच्या राजकारणामुळे काँग्रेसने या महापुरुषांचे म्हणणे ऐकले नाही. काँग्रेसने आंध्र प्रदेशात मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा केली. २००९ आणि २०१४ च्या जाहीरनाम्यातही काँग्रेसने हे आश्वासन दिले होते, असा आरोप मोदींनी रॅलीत केला. काँग्रेस सरकारने मुस्लीम समाजातील सर्व जातींना ओबीसीमध्ये टाकून सामाजिक न्यायाची हत्या केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
ते म्हणाले की, काँग्रेसला संविधान बदलून आणि एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षण काढून आपल्या मतपेढीला द्यायची आहे. काँग्रेस महिलांच्या दागिन्यांची हिशोब करायचा आहे. ही मालमत्ता एका विशिष्ट वर्गाला वाटली जाईल, असा आरोप त्यांनी केला. वारसा करावरील सॅम पित्रोदा यांच्या विधानावरही पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सॅम पित्रोदा यांनी आधी मध्यमवर्गीयांवर जास्त कर लावण्याची वकिली केली होती आणि आता ते वारसा कराबद्दल बोलत आहेत.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुम्ही तुमच्या मेहनतीने जमा केलेली संपत्ती तुमच्या मुलांना देणार नाही, तर काँग्रेस हिसकावून घेईल. त्यांना आयुष्यात आणि नंतरही लुटण्याचा काँग्रेसचा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही जिवंत असाल, तेव्हा ते तुमच्यावर जास्त कर लावतील, जेव्हा तुम्ही जिवंत नसाल तेव्हा ते वारसा कर लादतील.”