श्रीवर्धन - काळिंजे खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन; मच्छिमारांनी दिले जीवदान

    23-Apr-2024   
Total Views |
kalinje creek


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे (kalinje creek). मच्छीमारांना खाडीत मासेमारी करतेवेळी हा जीव जाळ्यात सापडला (kalinje creek). त्यांनी लागलीच या जावीला जाळ्यातून बाहेर काढून खाडीत पुन्हा सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (kalinje creek)
 
श्रीवर्धन तालुक्यापासून १३ किमी अंतरावरील काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले आहे. याठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. या बेटावरच वालूकामय चिखलाच्या मैदानाचा एक मोठा भाग पसरलेला आहे. काळिंजे गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी येथील मच्छीमार अनीस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात समुद्री घोडा आढळला. खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाग टाकलेला असताना, त्या जाळ्यात नारंगी रंगाचा समुद्री घोडा आढळल्याची माहिती फणसोपकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यांनी लागलीच या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढले आणि याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानाचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली. त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करुन फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीने पुन्हा त्याला खाडीत सोडले. या समुद्री घोड्याची लांबी १३ सेमी होती. समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून त्याला वाघाएवढे संरक्षण देण्यात आले आहे.

काळिंजे खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन सुरू आहे. गावातील स्थानिक लोक कांदळवन कक्षाच्या मदतीने निसर्ग पर्यटन करत आहेत. या खाडीत कांदळवनांच्या ११ प्रजाती आढळत असून पक्ष्यांच्या सुमारे ८० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. तसेच पाणमांजरांचा अधिवास या परिसरात पाहावयास मिळतो. महत्त्वाचे म्हणजे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी असून तिथे कोल्हे व रानडुंगरांचे अस्तिव आहे. त्यामुळे येथील जैवविविधता लक्षात घेऊनच निसर्ग पर्यटनाला सुरुवात केली आहे. अधिक माहितीसाठी ९२७२८८२४८२ (विक्रांत गोगरकर) यांच्याशी संपर्क साधावा.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.