खवय्यांना दुःखद बातमी! झोमॅटोने ४ ते ५ रुपयांनी प्लॅटफॉर्म फी वाढवली ! खिशाला नवा भार..

कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी कंपनीने घेतला हा निर्णय, इंटरसिटी डिलिव्हरी सेवाही बंद करणार !

    22-Apr-2024
Total Views |

Zomato
 
 
मुंबई: खवय्यांसाठी दुःखद बातमी! फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फूड डिलिव्हरीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये ४ ते ५ रुपयांनी वाढ केली आहे. २० एप्रिलपासून हे नवे दर लागू झाले आहेत.झोमॅटो कंपनीच्या प्रवक्त्याने ' हा निर्णय व्यवसायिक स्वरूपाचा असून कालांतराने हा निर्णय घेण्यात आला आहे ' असे सांगितले आहे.
 
ही दरवाढ भारतातील मुख्य शहरांमध्ये प्रामुख्याने मुंबई, हैद्राबाद, लखनऊ, बंगलोर या शहरांमध्ये झाली आहे.कंपनीने आपल्या महसूल उत्पादनात वाढ करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याशिवाय इंटरसिटी डिलिव्हरी सेवा 'इंटरसिटी लेंजड' ही कंपनीने रद्द केली आहे. यादरम्यान भारताबाहेर पुरवलेल्या सेवावरील थकित ११.८२ कोटीचा जीएसटी करासाठी झोमॅटोला दंडात्मक नोटीस मिळाली होती. जुन २०१४ ते जून २०१७ या कालावधीतील झोमॅटोची उपकंपनीने केलेल्या परदेशी विक्रीवरचा हा थकीत कर प्रलंबित होता. यामध्ये कंपनीला १८४ कोटी रूपयांचा दंड ठोठावला गेला होता.
 
कंपनीला ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत १३८ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.मागील आर्थिक वर्षात मात्र या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील कालावधीत ३४७ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. कंपनीने फी मध्ये वाढ केल्यानंतर सोमवारी कंपनीच्या समभागात ५ टक्यांनी वाढ झाली होती.