'कोकणच्या फुलराणी'च्या नव्या वाणाचा शोध; सड्यांवर फुलते ही सुंदर प्रजात

    20-Apr-2024   
Total Views | 500
dipcadi concanense


मुंबई (अक्षय मांडवकर) -
 'कोकणातील पुष्पप्रजातींची राणी' म्हणून ओळखली जाणारी 'एकदांडी’ म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स’ (dipcadi concanense) या प्रजातीच्या नव्या वाणाची (व्हरायटी) नोंद करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सड्यावरून या वाणाची नोंद करण्यात आली असून, त्याचे नाव 'देवरुखेन्स’ असे ठेवण्यात आले आहे (dipcadi concanense). महाराष्ट्रासाठी प्रदेशनिष्ठ असणार्‍या या संकटग्रस्त प्रजातीच्या नव्या वाणाच्या नोंदीमुळे देवरुखमधील सड्यांचे जैविक महत्त्व अधोरेखित झाले आहे. (dipcadi concanense)

’दिपकाडी कोंकणेन्स’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणार्‍या या वनस्पतीचे अस्तित्व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मिळून अंदाजे 30 ठिकाणांवर आहे. त्यामुळे ’आययुसीएन’च्या लाल यादीत या प्रजातीला ’संकटग्रस्त’ प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ‘एकदांडी’, ‘गौरीची फुलं’ किंवा ‘ढोकाची फुलं’ अशा स्थानिक नावांनी ही प्रजात ओळखळी जाते. भारतातील ‘दिपकाडी’ प्रजातीच्या वर्गीकरणावर हेन्सल रॉड्रिक्स, सुचंद्रा दत्ता आणि किरण चक्राल हे वनस्पतीशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांनी ’दिपकाडी कोंकणेन्स’ या प्रजातीच्या ’देवरुखेन्स’ या नव्या वाणाची नोंद केली आहे. या संदर्भातील संशोधन गुरुवार, दि. 18 एप्रिल रोजी ’फायटोटॅक्सा’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

देवरुखमधील साडवलीच्या सड्यावरून ’दिपकाडी कोंकणेन्स’च्या नव्या वाणाची नोंद करण्यात आली आहे. एका प्रजातीमधून नव्या प्रजातीची निर्मिती ही हजारो वर्षांच्या कालावधीत होते. या विकासाच्या प्रक्रियेत प्रजातीमध्ये अनेक बदल होतात आणि हे नवे बदल म्हणजे त्याचे विविध वाण असतात. साडवलीच्या सड्यावर आढळणार्‍या ’दिपकाडी कोंकणेन्स’च्या प्रजातीमध्ये आम्हाला रत्नागिरीत आढळणार्‍या ’दिपकाडी कोंकणेन्स’पेक्षा आकारशास्त्राच्या अनुषंगाने काही बदल जावणले. पाने, फुले आणि कॅप्सूलच्या आकारात बदल असले, तरी हे बदल साडवलीतील दिपकाडीला नवी प्रजात घोषित करण्याएवढे नसल्याने आम्ही त्याची नोंद नवीन वाण म्हणून केल्याची माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ सुचंद्रा दत्ता यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.



मूळ ’दिपकाडी कोंकणेन्स’च्या दलपुंजाची (करोला) लांबी पाच सेंमी असून ’देवरुखेन्स’ या वाणाच्या दलपुंजाची लांबी तीन ते साडेतीन सेंमी आहे. ’दिपकाडी कोंकणेन्स’च्या दलपुंजाची लांबी मोठी असल्याने त्याचे परागीभवन निशाचर पतंगांकडून होत असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ’देवरुखेन्स’ या वाणाच्या दलपुजांची लांबी तुलनेने लहान असल्याने त्याचे परागकण वाहून नेणार्‍या किटकांचा अभ्यास करण्याची गरज आहे. या शोधनिबंधामधून आम्ही ‘दिपकाडी कोंकणेन्स’, ’दिपकाडी गोवेन्स’, ‘दिपकाडी जनाई- श्रीरंगी’ आणि या नव्या वाणाची विभागणी ’दिपकाडी’च्या वेगळ्या मालिकेमध्ये (ब्रुनो-निव्हियस) केली आहे. कारण जगात केवळ ही नवी वाण आणि तिन्ही प्रजातींमधील फुलांचा रंग पांढरा शुभ्र असून बिया या मातकट काळ्या रंगाच्या आहेत.- हेन्सल रॉड्रिक्स, वनस्पतीशास्त्रज्ञ


साडवलीचे संवर्धन गरजेचे
’सह्याद्री संकल्प सोसायटी’ गेली चार ते पाच वर्षे देवरुख परिसरातील सड्यांची जैवविविधता जोपासण्यासाठी संशोधन आणि संवर्धन कार्यक्रम राबवत असल्याची माहिती सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी दिली. “देवरुखमधील सडे हे खासगी मालकीचे असून, येथील संकटग्रस्त अशा प्रदेशनिष्ठ प्रजाती टिकाव्या म्हणून आम्ही सोसायटीतर्फे शाळा, महाविद्यालये आणि गावकर्‍यांचे प्रबोधन करत आहोत. ‘एकदांडी’च्या नव्या वाणाच्या नोंदीमुळे आणि त्याला दिलेल्या नावामुळे देवरुखमधील सड्यांचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. मात्र, केवळ संशोधनावर न थांबता, इथल्या सड्यांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे.” त्यासाठी सर्व घटकांची मदत तेवढीच आवश्यक असल्याचे मोरे यांनी सांगितले.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121