'अटल सेतू' बनला 'मकॅन' फ्लेमिंगोचा निवारा; गुजरात ते मुंबई दरम्यान कापले एवढे अंतर

मोठ्या रोहित पक्ष्याचे गुजरात ते अटल सेतू स्थलांतर

    18-Apr-2024   
Total Views |
flamingo migration



मुंबई (अक्षय मांडवकर) - '
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग’ केलेला एक रोहित (फ्लेमिंगो) पक्षी 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’च्या निवार्‍यास आला आहे (flamingo migration). 'मकॅन’ नावाचा हा रोहित पक्षी टॅग केल्यापासून गुजरात ते ठाणे खाडी असा प्रवास करत असून गेली दोन वर्षे तो अटल सेतू परिसरात स्थलांतर करत आहे (flamingo migration). 'जीपीएस टॅग’मुळे त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा उलगडा झाला आहे. (flamingo migration)

'बीएनएचएस’कडून 'अटल सेतू’चा पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा अभ्यास सुरू आहे. याअंतर्गत संस्थेने 2022 मध्ये ठाणे खाडीतील छोट्या आणि मोठ्या रोहित पक्ष्यांचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांचा 'उपग्रह टेलिमेट्री अभ्यास’ सुरू केला होता. या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी तीन छोट्या आणि तीन मोठ्या रोहित पक्ष्यांवर सौर ऊर्जेवर चालणारे 'जीपीएस-जीएसएम’ रेडिओ टॅग लावले होते. त्यांची 'खेंगरजी’, 'लेस्टर’, 'मकॅन’, 'सलीम’, 'हुमायून’ आणि 'नवी मुंबई’ अशी नावे ठेवण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांमध्ये या सहामधील दोन रोहित पक्ष्यांचे टॅग बंद पडले आहेत. यंदा केवळ 'मकॅन' नावाचा मोठा रोहितच हिवाळी स्थलांतरदरम्यान गुजरातहून मुंबईत दाखल झाला आहे. इतर तीन पक्षी गुजरातमधील भावनगर, नवलखी आणि मोरबी परिसरातच आहेत.
 

flamingo migration
यंदा 'मकॅन’ मुंबईत आल्यापासून अटल सेतू परिसरात वावरत असल्याची माहिती 'बीएनएचएस’चे शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. यंदा या पक्ष्याचा वावर हा अटल सेतू परिसर, चिताकॅम्प, शिवडी ते अगदी पलीकडच्या किनार्‍यावरील सीवूड्स येथील पाणथळ क्षेत्रापर्यंत आहे. सद्यपरिस्थितीत या पक्ष्याचा वावर टॉम्बे येथील 'टाटा पॉवर केंद्रा’तील पाणी साठवण्यासाठी वापरात येणार्‍या तळ्यांमध्ये असून हा परिसर अटल सेतूला लागूनच आहे. शिवडी दलदलीवर येणारे फ्लेमिंगो पक्षी हे ओहोटीच्या वेळी अटल सेतू परिसरातील दलदलीच्या मैदानावर भक्ष टिपण्यासाठी उतरतात, तर भरतीच्या वेळी आराम करण्यासाठी ते टाटा पॉवर केंद्रातील किंवा सीवूड्स येथील छोट्या तळ्यांमध्ये जातात. मकॅन हा अल्पवयीन मोठा रोहित असून त्याचे नाव प्रख्यात निसर्गतज्ज्ञ आणि 'बीएनएचएस’चे माजी साहाय्यक अधिक्षक चार्ल्स मकॅन यांच्या नावावर ठेवले आहे.

भविष्यात २०० हून अधिक पक्ष्यांचे टॅगिंग
'जीपीएस’ तंत्रावर आधारित या अद्ययावत उपकरणांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतराची बिनचूक माहिती मिळत आहे. 'बीएनएचएस’ने गेल्या २५ वर्षांत १७५ पेक्षा अधिक पक्ष्यांचा सॅटेलाईट व जीएसएम उपकरणांद्वारे अभ्यास केला आहे. पक्षी व त्यांच्या अधिवासांच्या संवर्धनात या उपकरणांमुळे मिळालेल्या माहितीचा मोठा वाटा आहे. ’बीएनएचएस’ महाराष्ट्रामध्ये पुढील दोन वर्षांत २०० हून अधिक पक्ष्यांचा अभ्यास 'जीएसएम’ उपकरणांद्वारे करणार आहे.- डॉ. राहुल खोत, उपसंचालक, बीएनएचएस
‘मकॅन’चा प्रवास
'मकॅन’ला दि. २२ जानेवारी, २०२२ रोजी भांडुप उदंचन केंद्राच्या परिसरात टॅग करण्यात आले होते. त्याचवर्षी हा पक्षी दि. १५ जुलै, २०२२ रोजी गुजरातमधील भावनगर येथे परतला होता. २०२२ मध्ये या पक्ष्याने विक्रोळी येथील पाणथळ परिसरातून दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता गुजरातच्या दिशेने उड्डाण केले होते. तो दि. १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता गुजरातमधील घोघा किनार्‍यावर पोहोचला होता. या पक्ष्याने कुठेही न थांबता तब्बल ३०० किमीचे अंतर सलग १५ तासांमध्ये गाठले होते. त्यानंतर २०२३ आणि २०२४ ही दोन्ही वर्षे ’मकॅन’ हा भावनगरहून मुंबईत स्थलांतर करत आहे.
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.