नारायण राणेंना तिकीट जाहीर होताच नितेश राणे स्पष्टच बोलले, "आता तुम्हीच ठरवा थेट मोदींशी..."
18-Apr-2024
Total Views |
रत्नागिरी : थेट मोदीजींशी संपर्क साधणारा खासदार आम्हाला निवडून द्यायचा आहे. सतत रडत बसणारा आणि नकारात्मक वृत्ती असणारा खासदार आता आपल्याला नको आहे, असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊतांना लगावला आहे. भाजपने गुरुवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नितेश राणेंनी चिपळून येथे माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "आतापर्यंत २०१४ आणि २०१९ मध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच विनायक राऊत निवडून गेलेले होते. त्यांना भाजपची मतं मिळाली नसती तर ते खासदारही होऊ शकले नसले. पण निवडून गेल्यानंतर त्यांनी सातत्याने भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. याचा राग भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. येत्या ६ तारखेला आमच्या हक्काचा महायूतीचा खासदार निवडून आणू. इथे भाजप आणि महायूतीची ताकद किती आणि कशी आहे हे आम्ही दाखवून देणार आहोत."
"खासदार नेमका कसा असतो, त्याचं वजन किती असतं, तो आमच्यासाठी काय करु शकतो हे या मतदारसंघातील जनतेला २०१४ पासून आतापर्यंत कळलंच नाही. कोकणासाठी कुठलीही महत्वाची घोषणा झाली तर विनायक राऊत आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी केवळ कोकणाच्या भवितव्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. कुठलाही रोजगारनिर्मितीचा प्रकल्प आल्यास ते लगेच काळ्या मांजरासारखे आडवे जातात आणि आमच्या मुलामुलींना रोजगार मिळवण्यात अडथळे आणतात," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राजकीय ईच्छाशक्ती आणि वजन वापरून प्रश्न सोडवणारा आणि सकारात्मक पद्धतीने काम करणारा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. सतत रडत बसणारा आणि नकारात्मक वृत्ती असणारा खासदार आता आपल्याला नको आहे. गेल्या दहा वर्षांपैकी ७ वर्ष विनायक राऊत सत्ताधारी खासदार होते. २०१४ ते २०१९ मध्ये शिवसेना-भाजप सरकार असतानाही ते काहीच करु शकले नाही. त्यानंतर त्यांचे हक्काचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ते कोकणासाठी काही करु शकले नाहीत. दहापैकी सात वर्ष तुम्ही सत्ताधारी खासदार असतानाही ते आपल्या मतदारसंघासाठी काही करु शकले नाही. त्यांनी आपल्या अहवालात दिलेल्या सर्व कामांचे निधी मोदी सरकारच्याच माध्यमातून मिळाले आहेत. त्यामुळे फिरून जाण्यापेक्षा थेट मोदीजींसोबत उठबस करणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे," असेही ते म्हणाले.