"अबकी बार सुनेत्रा पवार! कारण भाकरी फिरवायची वेळ आली!"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुळे-पवारांवर शरसंधान

    18-Apr-2024
Total Views |
 
Mahayuti Pune
 
पुणे : बारामतीमध्ये परिवर्तन करण्याची वेळ आली असून आता अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. गुरुवारी बारामतीतील महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे येथे आयोजित महायूतीच्या सभेत ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "बारामतीमध्ये परिवर्तानाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. त्यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे आणि बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी १५ वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतू आता अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. बरोबर फिरवा."
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसला वंचितचा दणका! उत्कर्षा रुपवते निवडणूक लढवण्याची शक्यता
 
"बारामतीची लढाई ही ऐतिहासिक असली तरीसुद्धा ती वैयक्तिक लढाई नाही तर विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी आहे. खरंतर देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजितदादांनी महायूतीला साथ दिली. त्यामुळे ही निवडणूक एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून ही लोकसभेची निवडणूक आहे. ही देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "ज्यांना लेकीमध्ये आणि सुनेमध्ये अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही," असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला. तसेच बारामतीच्या विकासात पवार साहेबांचं योगदान कोणीही अमान्य करणार नाही. परंतू, अजितदादा पवारांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं. मात्र, जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजितदादांवर अन्यायच झाला. शेवटी सहनशीलतेचा कुठेतरी अंत असतो. त्यामुळे अजितदादांनी मोदीजींवर विश्वास ठेवला आणि राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करु लागले. मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो आणि त्यामध्ये अजितदादांच्या रुपाने अधिक भक्कम साथ मिळाली," असेही ते म्हणाले.