पुणे : सुनेला पाठवा दिल्लीत आणि लेकीला राहूद्या गल्लीत, असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचें नाव न घेता लगावला आहे. गुरुवारी महायूतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्या प्रचारार्थ पुण्यात महायूतीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "सुनेत्रा वहिनींना उमेदवारी दिल्यावर बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीची टीका करत आहेत. परंतू, आपल्या राजकारणात किंवा समाजकारणात जेव्हा कोणत्याही पुरुषाचा सत्कार होतो तेव्हा एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, असं म्हणण्याची पद्धत आहे. पण महिलांनी फक्त पाठीमागेच उभं राहायचं का? अजितदादा पवार यांनी सुनेत्राताईंना दिल्लीमध्ये जाण्याची संधी देऊन त्यांच्या मतदारसंघात एक आदर्श घालून दिला आहे. त्यासाठी मी त्यांचं कौतूक करते. यावेळी मला एक घोषणा द्यावीशी वाटते. सुनबाईंना पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत," असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे नाव न घेता टोला लगावला.
गुरुवारी महायूतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या दोघींनीही बारामती लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील एक डमी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, यावेळी बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना रंगणार आहे.