इराणचा इस्रायलवरील अपयशी हल्ला वाढवे विश्वाची चिंता

    17-Apr-2024   
Total Views |
 a
 
इराण-इस्रायल युद्धामुळे अमेरिका इस्रायलच्या बाजूने ओढली जाऊन, या परिस्थितीचा फायदा रशिया घेईल, अशी भीती आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धात युक्रेनची बाजू कमकुवत झाली असून, अमेरिकेच्या सक्रिय मदतीशिवाय त्यांना पराभव पत्करण्याची भीती आहे. युक्रेन आणि इस्रायल यांच्यापैकी अमेरिकेचा ओढा इस्रायलकडे असणार, हे उघड आहे.
 
पश्चिम आशियाच्या आकाशात युद्धाचे ढग दाटून आले आहेत. दि. १३ एप्रिलच्या रात्री इराणकडून इस्रायलवर सुमारे ३५० ड्रोन, क्रुझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. दि. १ एप्रिल रोजी इराणच्या दमास्कस येथील दूतावासाच्या परिसरातील एका इमारतीवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरचे प्रमुख ब्रिगेडियर रझा झहेदी, जनरल हाजी रहिमी तसेच कुड्स फोर्सचे ब्रिगेडियर हुसेनी अमिरुल्लाह यांच्यासह ११ लोक मारले गेले. हा हल्ला इस्रायलने घडवून आणला असून, आपल्या दूतावासाला लक्ष्य करण्यात आल्याने आपण त्या प्रमाणात प्रतिहल्ला केल्याचा दावा इराणने केला. इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी इराणकडून तुर्कीसह अन्य मित्रदेशांना आपण अशा प्रकारचा हल्ला करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ती सर्वत्र पसरल्यामुळे अनेक देशांनी या भागातून प्रवास करणार्‍या आपल्या विमानांचा मार्गही बदलला होता. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुमारे एक हजार किमी अंतर आहे. इराणने सोडलेले ड्रोन ताशी सुमारे २०० किमी वेगाने प्रवास करणारे असल्यामुळे इस्रायल आणि मित्रराष्ट्रांना ते हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी सुमारे चार ते पाच तासांचा अवधी मिळाला. यातील काही हल्ले इराकमधून, तर काही येमेनमधील हुथी बंडखोरांकडून करण्यात आले.
 
समोर येत असलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये इराणने सुमारे १ हजार, ५०० किलो स्फोटके वाहू शकणार्‍या आणि दोन हजार किमी अंतरावर हल्ला करू शकणार्‍या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. इराणची रणनीती होती की, ड्रोनचा वापर करून इस्रायल आणि मित्रराष्ट्रांच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेला त्यात गुंतवायचे आणि ते बेसावध असताना क्रुझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून इस्रायलच्या लष्करी तळांचे जास्तीत जास्त नुकसान करायचे. पण, प्रत्यक्षात यातील अर्धी क्षेपणास्त्रं उड्डाणाच्या वेळेस किंवा इस्रायलच्या हवाई हद्दीपर्यंत पोहोचायच्या आतच कोसळली. उरलेल्यांपैकी जवळपास सर्वच्या सर्व क्षेपणास्त्रं इस्रायल, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डनच्या हवाई दलांनी एकत्रितपणे हवेतल्या हवेत नष्ट केली. इस्रायलपर्यंत पोहोचलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांमुळे एक बेदुइन अरब मुलगी जखमी झाली,तर इस्रायलच्या हवाईदलाच्या धावपट्टीचे थोडे नुकसान झाले. अल्पावधीतच इस्रायलने त्याच धावपट्टीवरून ‘एफ ३५’ विमानांचे उड्डाण करून इराणला खिजवले. इराणने केलेल्या हल्ल्यातील ९९ टक्क्यांहून जास्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रं हवेतल्या हवेत नष्ट करण्यात आली.
 
इस्रायलकडे त्रिस्तरीय क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आहे. गाझा पट्टी आणि लेबनॉनमधून येणार्‍या ड्रोन आणि रॉकेटसाठी लेझर किरणांची ‘आयर्न बीम’, ‘आयर्न डोम’ आणि ‘डेव्हिड स्लिंज’ या यंत्रणा आहेत. शेजारच्या देशांतून येणार्‍या क्षेपणास्त्रांसाठी ‘अ‍ॅरो यंत्रणा’ आहे, तर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांविरोधात अमेरिकेकडून मिळालेल्या ‘पेट्रियट’ आणि ‘थाड’ या यंत्रणा आहेत. या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या सर्व यंत्रणांनी आपले काम चोखपणे केले. इस्रायलचे लष्कर, नौदल आणि हवाईदलातील सहकार्य तसेच मित्र देशांशी असलेले सहकार्यही दिसून आले.
 
आपले अपयश लपवण्यासाठी इराणने आपले उद्दिष्ट चेतावणी देणे होते, असे सांगून सारवासारव केली. इस्रायल गाझा पट्टीत विद्ध्वंस करत असताना आखाती अरब देश इस्रायलला अप्रत्यक्षपणे मदत करून असून केवळ इराण मुस्लीम जगतासाठी संघर्ष करत असून असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण आपल्या बाजूने युद्धविराम केला असून, जर इस्रायलने खोडी काढली, तर त्याला चोख उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला. इराणची ही भूमिका पाश्चिमात्य देशांतील डाव्या उदारमतवादी माध्यमांनी उचलून धरली आहे. इराणला या संघर्षात अपयश येऊनही त्यांचा खर्च हा जेमतेम पाच कोटी डॉलर इतका होता, तर ही क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी इस्रायलला १०० कोटी डॉलरपेक्षा जास्त खर्च आल्याने हे प्रकरण इथेच थांबवावे, असा त्यांचा सूर दिसून आला.
 
दि. ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका आहेत. जो बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा पाठीराखा असलेला एक मोठा वर्ग या युद्धाच्या विरोधात आहे. पाच दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असणार्‍या जो बायडन यांनी इस्रायलला भक्कम पाठिंबा देऊन या युद्धाला प्रादेशिक स्वरुप येऊ दिले नाही. अमेरिकेने तातडीने भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र तसेच पर्शियन आखातात आपले नौदल तैनात केल्यामुळे हिजबुल्ला आणि इराणला इस्रायलवर थेट हल्ला करण्याची हिंमत झाली नाही. १९७९ साली इस्लामिक क्रांती झाल्यानंतर इराणच्या राजवटीने इस्रायलचा विनाश करण्याचे ध्येय ठेवले. त्यासाठी ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डस कोर’ आणि ‘कुड्स ग्रुप’च्या माध्यमातून इराक, सीरिया, लेबनॉन आणि येमेनमध्ये शिया दहशतवादी संघटनांना खतपाणी घालण्यात आले. गाझा पट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादसारख्या सुन्नी संघटनांनाही मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली.
 
इराणने गेल्या ४५ वर्षांमध्ये इस्रायलला थेट लक्ष्य करणे टाळले होते. असे म्हणतात की, “दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘हमास’कडून इस्रायलविरोधात करण्यात आलेल्या हल्ल्याची इराणला पूर्वकल्पना असली तरी हा हल्ला एवढा मोठ्या प्रमाणात असेल, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये केलेली कारवाई आणि अमेरिकेचे इस्रायलला असलेले पाठबळ पाहून लेबनॉनमधून ‘हिजबुल्ला’ची या युद्धात उतरण्याची हिंमत झाली नाही. ‘हिजबुल्ला’कडे सुमारे एक लाख रॉकेट आणि क्षेपणास्त्र असून किमान २५ हजार अनुभवी सैनिक आहेत. ‘हिजबुल्ला’ एकाच वेळेस दहशतवादी संघटनाही आहे आणि लेबनॉनच्या सरकारचा भागही आहे. २००६ साली इस्रायलविरूद्धच्या युद्धात ‘हिजबुल्ला’ ३४ दिवसांपर्यंत लढत राहिली असली तरी त्यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. भविष्यातही ‘हिजबुल्ला’ इराणवर अवलंबून रहाणार असली तरी ‘हमास’च्या मदतीसाठी स्वतःवर सर्वनाश ओढवून घ्यायची त्यांची तयारी नाही. येमेनमधून हुथी बंडखोर इस्रायलवर क्रुझ क्षेपणास्त्रांचा मारा करत असले, तरी या दोन देशांमध्ये एक हजार किमीपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे ही क्षेपणास्त्रं हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली जात आहेत.
 
इराणच्या या हल्ल्याला इराणमध्ये हल्ला करून उत्तर द्यावे, यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंवर त्यांच्या मित्रपक्षांचा दबाव आहे, तर इस्रायलने प्रतिहल्ला केल्यास त्यातून युद्धाचा भडका उडेल म्हणून इस्रायलने संयम दाखवावा, याकडे अमेरिका, इस्रायलचे मित्र देश आणि आखाती अरब देशांचा कल आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्यानंतर बेंजामिन नेतान्याहूंशी सुमारे २५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ‘जी ७’ देशांची बैठक घेतली. इस्रायलने इराण विरोधात कारवाई करू नये, यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांचा दबाव आहे. पश्चिम आशियात युद्ध पेटले, तर त्यामुळे तेलाचे भाव कडाडतील. जागतिक व्यापार हवाई वाहतुकीवर परिणाम होईल. तसेच या युद्धामुळे अमेरिका इस्रायलच्या बाजूने ओढली जाऊन, या परिस्थितीचा फायदा रशिया घेईल, अशी भीती आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धात युक्रेनची बाजू कमकुवत झाली असून, अमेरिकेच्या सक्रिय मदतीशिवाय त्यांना पराभव पत्करण्याची भीती आहे. युक्रेन आणि इस्रायल यांच्यापैकी अमेरिकेचा ओढा इस्रायलकडे असणार, हे उघड आहे. इराणला वेळीच इशारा दिला नाही, तर भविष्यात असे हल्ले पुन्हा पुन्हा होतील, याची इस्रायलला खात्री आहे. या युद्धाचा पहिला अंक संपला असला तरी उर्वरित भाग मात्र बाकी आहे.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.