जळगाव : सगळे आम्हाला फुटले म्हणतात. पण मी फुटलो नाही तर संजय राऊतांच्या समोर गेलो, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे आयोजित महायूतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, "ज्यावेळी पक्षाचा नेता आदेश देतो त्याप्रमाणे आमदारांनी काम करायचं असतं. त्यामुळे सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी साथ दिली. त्यांच्या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पण ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की, आपण आपल्या विचारांपासून लांब जात आहोत त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केला."
"लोकं म्हणतात तुम्ही गेले, फुटले पण आम्ही फुटलो नाहीत तर त्यांच्यासमोर गेलो. संजय राजाराम राऊतांच्या समोर गेलो. त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला हिणवलं म्हणून आम्ही २० आमदार गायब झालोत. मला घ्यायला गिरीष महाजन आले होते. मंगेश चव्हाण तर सफाई कामगाराचा ड्रेस घालून आले होते. मी अँब्युलन्समध्ये गेलो. मी ३३ नंबरला गेलो. मला गद्दार गद्दार म्हणतात पण मी वेट अॅण्ड वॉच केलं. आपण चुकलो आहे, चूक दुरुस्त करु शकतो, असं मला वाटलं. म्हणून मी काही पहिल्या रांगेत गेलो नाही तर ३३ नंबरला गेलो. त्यानंतर हे सरकार आलं. अडीच वर्ष या सरकारची प्रगती आणि गती आपल्यासमोर आहे," असे ते म्हणाले.