"मी सांगलीतून माघार घ्यायला तयार पण,..."; काय म्हणाला ठाकरेंचा उमेदवार?
17-Apr-2024
Total Views |
सांगली : माझी माघार घ्यायची तयारी आहे. फक्त मित्रपक्षांनी शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून चालणार नाही, हे जाहीर करावं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. सांगली लोकसभेच्या जागेसाठी सध्या मविआमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरल्याने आता विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
चंद्रहार पाटील एका सभेत बोलताना म्हणाले की, "अनेकजण म्हणतात की, मी नवखा उमेदवार आहे. पण वयाच्या बावीसाव्या वर्षी मी पहिलं मतदान करुन समोर ३० वर्षे निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या १० मतांनी पराभूत केलं. त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. पण आज जर तुम्हाला खरंच माझ्या उमेदवारीची अडचण वाटत असेल तर माझी माघार घ्यायची तयारी आहे. फक्त मित्रपक्षांनी शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून चालणार नाही, हे जाहीर करावं. तुझ्यामागे कुठला कारखाना नाही. तुझा बाप आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी देत नाही असं त्यांनी जाहीर करावं. मी माघार घ्यायला तयार आहे. काँग्रेसने फक्त एवढं जाहीर करावं. भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातील मुलाने उमेदवारीची अपेक्षा करायची की, नाही?," असा सवाल त्यांनी केला आहे.
यावर विशाल पाटलांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "शेतकऱ्यांचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहवत नाही का, असा कुणीतरी आरोप करणार. पण या वसंतदादा घराण्याने शेतकऱ्याच्या मुलांना पदं देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाने आमदार, खासदार झालं पाहिजे, हीच आमची ईच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाला बसवून त्याचा बळी जावू नये, हे बघण्याची जबाबदारीसुद्घधा आमची आहे."
"त्यामुळे त्या पेहलवानांना माझी विनंती आहे की, राऊत साहेब आधीच इथे येऊन गोंधळ घालून गेलेत. ही सुसंस्कृत सांगली आहे. इथे शोभणारी भाषा बोलावी. आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकातील शब्द आणि भावना इथे वापरल्याने लोकं आणखी चिडतील. राजकारण करायचंच असेल तर संयमाने आणि भाषा सांभाळून करावं. ज्या शिवसेनेला वसंतदादांनी आवाज दिला तो आवाज त्यांच्याच विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे," असेही ते म्हणाले.