काँग्रेसचा तिढा सुटता सुटेना! नागपूरात तातडीची बैठक

    15-Apr-2024
Total Views |

Congress 
 
नागपूर : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसून आता मुंबईतील जागांबाबत नागपूर येथे तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. सोमवारी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये मुंबई आणि सांगलीच्या जागेवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी सांगली लोकसभेच्या जागेसाठी आग्रही असलेले आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांना बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "१६ तारखेपर्यंत वाट पाहणार अन्यथा..."; विशाल पाटलांचा प्लॅन काय?
 
मुंबईतील जागावाटपावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज आहेत. याबाबत त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली आहे. तसेच सांगली लोकसभेच्या जागेवरही काँग्रेसने दावा केला असून विशाल पाटील इथे लढण्यास इच्छूक आहेत. दरम्यान, या जागांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी तातडीची बैठक बोलवली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
 
दुसरीकडे, विशाल पाटील मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सांगली लोकसभेच्या जागेबाबत विशाल पाटील १६ तारखेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या निर्णयाची वाट पाहणार आहेत. अन्यथा ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल असल्याचे बोलले जात आहे.